दिंडोशीतील पाणी समस्येबाबत शिवसेनेचा महापालिकेवर आज जनप्रक्षोभ मोर्चा

दिंडोशी विधानसभा मतदारसंघात येणाऱया दिंडोशी, मालाड, गोरेगावमधील परिसरात निर्माण झालेल्या पाणी समस्येबाबत जाब विचारून प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, 6 जानेवारीला महापालिकेच्या पी पूर्व कार्यालयावर जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात येणार आहे.

दिंडोशी विधानसभेत येणाऱया दिंडोशी, मालाड, गोरेगाव पूर्व परिसराला सांस्कृतिक, कला, क्रीडा तसेच विविध गोष्टींचा वारसा आहे. कला, संस्कृतीचा वारसा लाभलेल्या या परिसरातील काही भागांत अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची दखल घेऊन सोमवार, 6 जानेवारीला सकाळी 10 वाजता आप्पापाडा रिक्षा स्टॅण्ड ते पुंदनलाल सैहगल मैदान (रामलीला मैदान) येथील पी/पूर्व विभाग महापालिका कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. रहिवाशांनी या जनप्रक्षोभ मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सुनील प्रभू यांनी केले आहे.