
विनापरवाना रिक्षाचालकांमुळे डोंबिवलीत अधिकृत रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. बेकायदा रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची वारंवार मागणी करूनही पोलीस लक्ष देत नसल्याने आज डोंबिवलीत वाहतूक पोलिसांमधील वाद चांगलाच चिघळला. विनापरवाना रिक्षा चालवणाऱ्यांना पोलिसांचे अभय मिळत असल्याने वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि डोंबिवली रिक्षाचालक-मालक युनियनच्या वतीने जोरदार आंदोलन केले.
रिक्षाचालकांनी बेकायदेशीर आणि विनापरवाना रिक्षा चालवणाऱ्यांविरोधात वारंवार तक्रारी करूनही वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा रिक्षाचालक- मालक युनियनने आरोप केला. बॅच आणि युनिफॉर्म नसलेल्या रिक्षाचालकांविरोधात कारवाई न झाल्यामुळे अधिकृत चालकांना त्रास सहन करावा लागत असल्याने आज आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन परिसरात रिक्षा बंद करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रिक्षा बंद आंदोलनामुळे काही वेळ प्रवाशांचेही हाल झाले.
आंदोलनात शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, उपशहरप्रमुख सूरज पवार, संघटक संजय पाटील, रिक्षाचालक-मालक युनियनचे शेखर जोशी, ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रमोद कांबळे, सुनील पवार, सचिन म्हात्रे, राजेश सावंत, शाम चौगले, प्रकाश खाडे, अर्जुन मौर्या, आदित्य पाटील, अभय दिघे, मंगेश सरमळकर, अनुज मोरे, जीत हाथी, मंथन साळवी, गोविंद कुलकर्णी, स्वप्नील पाटील, यश कदम, परेश म्हात्रे, विपुल म्हात्रे, चेतन म्हात्रे आदी सहभागी झाले होते.
पोलीस आयुक्त घटनास्थळी
सहाय्यक पोलीस आयुक्त संजय साबळे यांनी घटनास्थळी येऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. वाहतूक पोलिसांसह आरटीओ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बेकायदा रिक्षाचालकांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले