महाड विधानसभेवर भगवा फडकवणारच! आदेश मातोश्रीचा… निर्धार निष्ठावंतांचा

आदेश मातोश्रीचा.. आणि वज्रमूठ निष्ठावंतांची.. असे म्हणत महाड विधानसभेवर भगवा फडकवण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला आहे. महाड-पोलादपूर व माणगाव तालुक्यातील चाकरमान्यांच्या घाटकोपरमधील मेळाव्याला तुफान प्रतिसाद मिळाला असून गद्दाराला गाडा असे आवाहनही करण्यात आले. ऐतिहासिक महाड नगरीवर यापुढे भगव्याचाच आवाज घुमेल असेही स्पष्ट करण्यात आले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड यांच्या पुढाकाराने निष्ठावंतांचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यास महिला तसेच तरुणांची प्रचंड गर्दी झाली होती. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आपल्या भाषणात सांगितले की, येत्या विधानसभा निवडणुकीत चौथ्या चेंडूमध्येच गद्दाराची हिटविकेट काढल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही. महाडचा पुढील आमदार हा शिवसेनेचाच होईल असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.

गद्दाराला घरचा रस्ता दाखवणार

महाडमधील गद्दाराला घरचा रस्ता दाखवणार असून निष्ठावंत शिवसैनिकालाच सामान्य जनता निवडून देईल असे माजी नगराध्यक्षा व शिवसेनेच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनी आपल्या भाषणात सांगितले. या मेळाव्यास उपनेते व आमदार सचिन अहिर, उपनेते व कोकण समन्वयक विजय कदम, दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड, राजुल पाटील, शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष भाऊ कोरगावकर, प्रवक्ते अनिष गाढवे, विभागप्रमुख सुरेश पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या राखी जाधव, बाळ राऊळ, विधानसभा संपर्कप्रमुख अमित मोरे, धनंजय देशमुख, डॉ. स्विटी गिरासे, ज्योती मनवे, गजानन अधिकारी, आशीष फलसकर, अनिल मालुसरे, नाना जगताप, बंटी पोटफोडे, साधना वरसकर, स्वाती घोसाळकर आदी उपस्थित होते.