
नाशिकच्या गोविंदनगर येथे बुधवार, 16 एप्रिल रोजी शिवसेना पक्षाचे एकदिवसीय निर्धार शिबीर होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात रविवारी उपनेते सुधाकर बडगुजर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी या शिबिराच्या आयोजनाची माहिती दिली.
गोविंदनगरच्या मनोहर गार्डन येथे 16 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेपासून या शिबिराला सुरुवात होईल. एकूण तीन सत्रांमध्ये याचे नियोजन करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिबिराचा समारोप होईल. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यासह मान्यवर यावेळी विचार उपस्थित राहणार आहेत.
विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा, संघटनात्मक बांधणी आणि पुढील वाटचाल याबाबत यावेळी मंथन होईल, असे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. शिबिराच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाभर पदाधिकाऱ्यांसमवेत दौरा केला जाणार आहे, अशी माहिती डी. जी. सूर्यवंशी यांनी दिली. यावेळी उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, दिलीप मोरे, गुलाब भोये, बाळासाहेब कोकणे, महेश बडवे, प्रवीण चव्हाण, मसूद जिलानी, नितीन जाधव आदी हजर होते.