काहीजण स्वतःला विकास पुरुष म्हणवून घेण्यासाठी काँक्रीटचे रस्ते व बिल्डरांना फायदा करून देणारी धोरणे राबवत आहेत. मात्र सर्वसामान्य गरीब कुटुंबांतील तरुणांना कोपरी-पाचपाखाडी आणि ठाणे शहरात गेल्या २२ वर्षांमध्ये रोजगाराच्या संधी का उपलब्ध करून दिल्या नाहीत, असा थेट सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख व कोपरी-पाचपाखाडी विधानसभेतील उमेदवार केदार दिघे यांनी केला आहे.
कोपरी-पाचपाखाडीमध्ये शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. ठिकठिकाणी ते मतदारांशी थेट संपर्क साधत असतानाच मिंध्यांवर टीकेची झोडही उठवत आहेत. ते म्हणाले की, राज्याच्या सर्वोच्चपदी जाऊनही त्यांना या भागात रोजगाराच्या संधी आणता आल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात ते पूर्णपणे अपयशी असून असे नेतृत्व ठाणेकरांनी राजकीय पटलावरून हद्दपार करावे, असे आवाहन दिघे यांनी मतदारांना केले आहे.
सिमेंटचे रस्ते, टेंडर म्हणजे विकास नाही
काहीजण स्वतःला जनतेचा मसिहा समजतात, मात्र सर्वसामान्य जनतेसाठी मागील पंधरा वर्षांत सत्तेत असतानाही कोणती विकासकामे केली याचा लेखाजोखा ते देऊ शकत नाहीत, असे सांगतानाच केदार दिघे यांनी मिंध्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, फक्त सिमेंटचे रस्ते, बिल्डरांना फायदा होईल अशी धोरणे, कोटी-कोटींची टेंडर म्हणजे विकास नाही, हे त्यांना आता कुठेतरी सांगायची वेळ आली आहे. सर्वसामान्य माणसाला उत्तम दर्जाचे आरोग्य, तरुणांना नोकरी वा रोजगाराच्या संधी या भागात उपलब्ध करून देण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.