दहावीतल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांनी परीक्षेत घवघवीत यश मिळवावे, यासाठी दिंडोशी विधानसभा क्षेत्राच्यावतीने गोरेगाव, दिंडोशी, मालाड आणि कांदिवली विभागातील मराठी, हिंदी, सेमी हिंदी आणि इंग्रजी, सेमी इंग्रजी अशा 60हून जास्त शाळांमधील 3 हजार 17 विद्यार्थ्यांना मोफत प्रश्नसंचाचे वाटप करण्यात येत आहे.
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांना अभिप्रेत असलेला विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करून भवितव्य घडवण्यासाठी शिवसेनेकडून हा उपक्रम राबवला जात आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दहावीत शिकणाऱया विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाअभावी गुणवत्ता असूनही बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण संपादन करता येत नाहीत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, आमदार, मुख्य पक्ष प्रतोद सुनील प्रभू आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू यांच्या संकल्पनेतून व माजी महापौर अॅड. सुहास वाडकर यांच्या पुढाकारातून विधानसभा संघटक, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला शाखा संघटक, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख महिला-पुरुष यांच्यावतीने विभागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना तज्ञांनी तयार केलेल्या गुणवत्तापूर्ण सराव प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील प्रशांत कदम, प्रदीप निकम, भाई परब, गणपत वारिसे, सुनील गुजर, रिना सुर्वे, पूजा चव्हाण, युवासेनेचे प्रशांत मानकर, श्रुतिका मोरे, त्याचबरोबर पदाधिकारी-कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. आशीष प्रकाशनने हे सर्व सराव प्रश्नसंच तयार केले आहेत.
- प्रत्येक विषयाच्या सात प्रश्नपत्रिका असलेले पुस्तक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
हे प्रश्नसंच मराठी, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थांसाठी सोप्या भाषेत तयार करण्यात आले आहेत.
यात मराठी, हिंदी, इंग्रजी, बीजगणित, भूमिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान पेपर-1 आणि 2, इतिहास-राज्यशास्त्र, भूगोल-अर्थशास्त्र, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, इंग्लिश रीडर अशा विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.