चेंबूरमध्ये होऊ घातलेल्या प्रदूषणकारी आरएमसी प्लांटला परवानगी देऊ नका, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सोमवारी पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच या प्रकल्पासाठी एनओसी देणाऱया महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालादेखील शिवसेनेच्या वतीने प्रकल्प रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.
चेंबूरमधील एल. यू. गडकरी मार्गावरील प्रयागनगर व प्रकाश नगर या नागरी वसाहतीला खेटून असणारा सहा वर्षांहून अधिक काळ चालणारा आरएमसी प्लांट 2017 साली शिवसेना तसेच स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध करत बंद पाडला होता. हा प्रकल्प बंद पाडण्यासाठी नगरसेविका निधी शिंदे आणि उपविभागप्रमुख प्रमोद शिंदे यांनी सातत्याने प्रयत्न केला होता. चेंबूरमधील नागरिकांसाठी प्रचंड त्रासदायक आणि आरोग्यासाठी अतिधोकादायक ठरणारा आरएमसी प्रकल्प सात वर्षांनंतर पुन्हा होऊ घातला आहे. गनॉन नॉर्टेन व गनॉन डंकर्ली यांच्या खासगी जागेवर दोन आरएमसी प्लांट उभारणीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
मिंधे सरकारच्या राजवटीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्लांटला एनओसी दिली असून प्लांट उभारणीसाठी पालिकेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत या प्लांटला परवानगी देऊ नये अशी मागणी शिवसेना प्रभाग क्र. 148 च्या माजी नगरसेविका निधी शिंदे यांनी विक्रोळी पश्चिमच्या इमारत प्रस्ताव विभागाचे कार्यकारी अभियंता कोतकर यांच्याकडे केली. यावेळी विभागप्रमुख प्रमोद शिंदे, शाखा संघटक दक्षता पाताडे, स्थानिक रहिवासी प्रतिनिधी ईश्वर माळी, डॉक्टर गोस्वामी, साहेबा रेड्डी, सोपान हांडे, विद्या घोडके, विजय सागवेकर, संतोष मुंगळे आदी उपस्थित होते.