पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयाच्या शवागारापासून मृतदेह घरपोच पोहचवण्यासाठी असलेली शववाहिनी गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. यामुळे गोरगरीब कुटुंबातील मृत रुग्णांना घरी सोडण्यासाठी आर्थिक भुर्दंड पडत आहे. त्यामुळे बंद असलेली ही शववाहिनी तातडीने सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
‘केईएम’ रुग्णालयात मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱयातून रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. त्यामुळे येथे रोज रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी असते. मृत झालेल्या व्यक्तींना येथील शवागारात ठेवले जाते. या शवागारातून मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी शववाहिनी किंवा इतर वाहन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे पालिकेने मृतदेह घरापर्यंत सोडण्यासाठी शववाहिनी उपलब्ध केली आहे. या शववाहिनीमुळे नागरिकांना वेळेत सेवा मिळते, मात्र चालक नसल्याने शववाहिनी मागील दीड महिन्यापासून बंद ठेवण्यात आली आहे. शववाहिनी बंद असल्याने गरीब व गरजू नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे चालक उपलब्ध करून शववाहिनी पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.