गणेशोत्सवाला दोन महिने शिल्लक राहिले असताना मुंबईत मेट्रो, मोनो आणि ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे रस्त्यात खड्डे पडले आहेत. गणेशोत्सव आगमन आणि विसर्जनापूर्वी खड्डय़ांचे हे विघ्न दूर करून भाविकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे विधान परिषदेत केली.
मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा करण्यात येतो. गणेशोत्सव काळात मुंबईतील गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये काही ठिकाणी मोनो आणि मेट्रो रेल्वेच्या महाकाय लोखंडी खांबांचा अडसर निर्माण झाला आहे. आर्थर रोड, सात रस्ता येथे मोनो रेल्वेसाठी आडवे खांब कमी उंचीवर टाकण्यात आल्याने या रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱया गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकाRना मोठा अडसर निर्माण होणार आहे. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील काही भागांत रस्त्यांवरील खड्डे आणि असमतोलपणा आला आहे. यामुळे गणेशमूर्ती आगमन व विसर्जन सोहळ्यात विघ्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करून भाविकांना दिलासा द्यावा, अशी मागणी विशेष उल्लेख सूचनेद्वारे सुनील शिंदे यांनी सरकारला केली.