स्मार्टऐवजी पुन्हा जुने विद्युत मीटर बसवा! शिवसेनेची बेस्ट प्रशासनाकडे मागणी

लालबाग-परळमधील अनेक रहिवाशांच्या घरी असलेले जुने विद्युत मीटर हटवून बेस्ट उपक्रमातर्फे स्मार्ट विद्युत मीटर बसविण्यात आले आहेत. स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिल आल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटर हटवून पुन्हा जुने विद्युत वीज मीटर बसविण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बेस्ट उपक्रमाकडे करण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात केवळ अनिवासी गाळे आणि सरकारी कार्यालयात स्मार्ट विद्युत मीटर बसविण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तरीही बेस्टकडून निवासी गाळ्यांमध्येही स्मार्ट मीटर लावले जात असल्याने रहिवासी संभ्रमात आहेत. याविरोधातील अनेक तक्रारी रहिवाशांनी माजी आमदार दगडू सकपाळ यांच्याकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर दगडू सकपाळ यांनी बेस्ट उपक्रमाला निवेदन दिले असून स्मार्ट मीटर हटविण्याची विनंती केली आहे.