निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणे बंद करा, अन्यथा आंदोलन; बेस्ट कामगार सेनेचा प्रशासनाला इशारा

‘बेस्ट’मधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेऊन प्रशासनाकडून हजारो रुपयांचा पगार दिला जात आहे. यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या कंत्राटी कामगारांवर अन्याय होत असून त्यांच्यावर अविश्वास दाखवल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणे बंद करा, अन्यथा सर्व आगारांत शिवसेनाप्रणीत बेस्ट कामगार सेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बेस्ट कामगार सेनेकडून अध्यक्ष सुहास सामंत यांनी दिला आहे.

बेस्ट कामगार सेनेने या प्रकाराबाबत आवाज उठवल्यानंतर महाव्यवस्थापक डिग्गीकर यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार नाही, असे धोरण अंवलंबण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र याची अंमलबजावणी केली जात नसल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.

ज्यांच्यावर उच्च न्यायालयात त्यांच्या प्रमोशनबद्दल दावा दाखल आहे असे परमार यांना कंत्राटी कामगार म्हणून 98 हजार पगार देण्यात येत आहे. परमार यांनी सेवानिवृत्त होण्याच्या फक्त 20 दिवस अगोदर बेस्टचे सर्व नियम डावलून स्वतःचे प्रमोशन करून घेतल्याचा आरोपही सुहास सामंत यांनी केला आहे. परमार यांना सेवानिवृत्तीनंतर जवळपास 20 लाखाचा फायदा झाला आहे. त्यांच्या या प्रमोशनबद्दल सुहास नलावडे उच्च न्यायालयात गेले असून त्यांची केस चालू असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

सात दिवसांचा अल्टीमेटम

बेस्ट कामगार सेनेच्या आंदोलनानंतर लेखा विभागाचे कर्मचारी अमोल मोरजकर यांना फक्त तीन महिनेच नवीन आत्याधुनिक संगणक प्रणालीवर काम करण्यासाठी ठेवण्यात आले असून पुन्हा कामावर घेणार नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र त्यांना 98 हजार रुपये पगार देऊन पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. हा प्रकार पुढील सात दिवसांत थांबला नाही तर बेस्ट कामगार सेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सुहास सामंत यांनी दिला आहे.