सरकारच्या शिक्षक कपातीविरोधात ठाण्यात शिवसेनेचे आंदोलन, मराठी शाळा बंद कराल तर खबरदार… डाव उधळून लावू!

नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविण्याची घोषणा सरकारने केली आहे. मात्र दुसरीकडे शिक्षकांची कपात करण्याचा निर्णय घेतला असून याचा जबरदस्त फटका ग्रामीण भागातील मराठी, रात्र तसेच भाषिक शाळांना बसणार आहे. सरकारच्या या दुटप्पी धोरणाविरोधात आज शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाण्यात जोरदार आंदोलन करत मराठी शाळा बंद करण्याचा डाव उधळून लावण्याचा इशारा दिला.

राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक कपात करण्यात येणार आहे. या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष तथा विधान परिषद आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांच्या आदेशानंतर तसेच शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा शिक्षक सेनेने ठाण्यातील बी. जे. हायस्कूल येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान शिक्षकांनी घोषणा देत सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध केला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख केदार दिघे, संपर्कप्रमुख नरेश मणेरा, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, वसंत गवाळे, राजेंद्र महाडिक, कुलदीप पाटील, दिलीप चौधरी, भगवान गावडे, मारुती पडळकर, जगदीश भगत, संतोष गायकवाड, प्रकाश फर्डे, आकांक्षा राणे, प्रमिला भांगे, संगीता साळवी, सुनंदा देशपांडे, प्रशांत सातपुते उपस्थित होते.

दरम्यान ग्रामीण, आदिवासी, मराठी शाळांचे संरक्षण सरकारने करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केली.

या आहेत प्रमुख मागण्या

– शिक्षक कपातीचा निर्णय त्वरित रद्द करावा.
– नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी शिक्षक संख्येत वाढ करावी.
– रात्रशाळा व दुर्गम भागातील शाळा बंद होणार नाहीत याची हमी द्यावी.

शासन निर्णयानुसार राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक विषय शिकविण्यासाठी शिक्षक उपलब्ध होणार नाहीत. – सचिव पडळकर (सचिव, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना)

‘शाळा टिकल्या तरच शिक्षण टिकेल’ या घोषणेसह हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. ठाण्यातील शिक्षकांचाही या धोरणाला तीव्र विरोध आहे. – भगवान गावडे (ठाणे जिल्हाध्यक्ष शिक्षक सेना)