रणरागिणींनी दिले जखमी तरुणाला जीवदान

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मातोश्री येथे वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शिवसेनेच्या दोन रणरागिणी घरी परतत होत्या. प्रभादेवीमध्ये दोन दुचाकीच्या अपघातामुळे रस्त्यावर जखमी होऊन बेशुद्ध पडलेला तरुण दिसला. आदित्य शिंदे असे या तरुणाचे नाव असल्याचे त्यांना समजले.

पोलीस अजून आले नव्हते. तरुणाला वेळीच रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते, नाही तर त्याच्या जीवावर बेतले असते. बघ्यांची गर्दी वाढत होती. मात्र मदत करायला कुणी पुढे येत नव्हते. अपघाताचा मामला होता, त्यामुळे पोलीस केस होणार होती. अशा परिस्थितीत कुणी मदतीला येत नव्हते. अशा वेळी प्रसंगावधान राखून उपविभाग संघटक लतिका पाष्टे आणि विधानसभा समन्वयक मानसी पुजारी यांनी त्या तरुणाला स्वतःच्या गाडीत घालून पोद्दार रुग्णालयात नेले. तिथेही गेल्यावर ’अपघाताचा मामला आहे, पोलीस आल्याशिवाय आम्ही काही करणार नाही,’ असे सांगून उपचारात टाळाटाळ करण्यात येत होती. मात्र, शिवसेना स्टाईल हिसका दाखवताच डॉक्टरांनी उपचार सुरू केले. डॉक्टर म्हणाले, ‘आजकल एवढीही माणुसकी कोणी कोणावर दाखवत नाही. पण तुम्ही उद्धव साहेबांच्या रणरागिणी आहात. त्यामुळे हे शक्य झाले.’ एका जखमी तरुणाला वेळीच उपचार मिळाले आणि त्याचा जीव वाचला. तरुणाच्या कुटुंबीयांनी मनापासून आमचे, शिवसेनेचे आणि उद्धव साहेबांचे आभार मानले.