हजारो कुटुंबांना अपात्र ठरवण्याचा प्रयत्न केला तर धारावीत संघर्ष पेटेल! शिवसेनेचा राज्य सरकारला इशारा

धारावीकर विकासाच्या आड येणार नाहीत, मात्र विकासाच्या नावाखाली कित्येक वर्षांपासून धारावीत राहत असलेल्या हजारो कुटुंबांना अपात्र ठरवण्याचा उद्योग सुरू आहे. अशा प्रकारचा प्रयत्न याआधी कोणत्याही सरकारने केलेला नाही, मात्र हे राज्य सरकार धारावीतील हजारो कुटुंबांना अपात्र ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. असा प्रयत्न जर होत असेल तर धारावीत संघर्ष पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी राज्य सरकारला दिला. दरम्यान, जोपर्यंत 500 चौरस फुटांचे घर देण्याचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत सरकार आणि अदानीला धारावीकर अजिबात सहकार्य करणार नाही, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

धारावीमधील बडी मशिदजवळ धारावी बचाव आंदोलन आणि भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आयोजित भव्य सभेला अनिल देसाई यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलत होते. धारावीत किती हजार लोकांना घरे देणार, घरे किती फुटांची राहणार याचा मास्टर प्लॅन, नकाशा दाखवा आणि हॉस्पिटल, रस्ते, उद्यान, शाळा, कॉलेज कोठे असणार हेही अदानी कंपनीने धारावीतील लोकांना प्रोजेक्टरवर दाखवा, असे आव्हानही अनिल देसाई यांनी अदानी कंपनीला दिले. यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे संस्थापक-अध्यक्ष वामन मेश्राम, जावेद अहमद, प्रभाकरन, पूनम मोहित, पॉल राफे, तेग बहाद्दूर, आदम जाला, किरण सावंत, अॅड. विद्या त्रिरत्ने, अनिल माने, कमालभाई यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप, भाकप, आम आदमी पक्षांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हजारो धारावीवर उपस्थित होते.

धारावी मुंबईचे काळीज

धारावीत सात रेल्वे स्थानके आहेत. धारावीतून संपूर्ण मुंबईत जाण्यासाठी धारावी हे महत्त्वाचे केंद्र आहे. अशी ही धारावी मुंबईचे काळीज असून ते पळवण्याचे काम अदानी करत आहे. धारावीतील मूळ 90 टक्के लोकांना इथून हुसकावून केवळ 10 टक्के धारावीकरांना येथे ठेवण्याचे षड्यंत्र अदानीने रचले आहे, मात्र आम्ही हे षड्यंत्र हाणून पाडू, असा इशारा धारावी बचाव आंदोलनाचे नेते बाबूराव माने यांनी केला.