दहिसरच्या कोकणीपाड्यात पालिकेने प्रकल्प सुरू करताना स्थानिक रहिवासी, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या प्रकल्पातून उडणाऱ्या धुळीमुळे प्रकल्पाशेजारील रहिवाशांना त्रास होत आहे. तसेच राडारोडा घेऊन येणाऱया भरधाव लॉरीखाली चिरडून अनेक अपघात होत असून तीन महिन्यांत झालेल्या अपघातांत तीन लहान मुलांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे प्रदूषण आणि अपघात होणार नाही याची हमी द्या, अन्यथा प्रकल्प चालू देणार नाही, असा इशारा शिवसेना विभागप्रमुख उदेश पाटेकर व माजी नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी दिला आहे.
महापालिकेच्या माध्यमातून खासगी जागेवर तब्बल पाच एकर जागेवर प्रकल्प उभारताना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांनाही विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करीत आज स्थानिक रहिवाशांनी प्रकल्पस्थळावर धडक दिली. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या धुळीबाबत काय उपाययोजना करणार? या ठिकाणच्या अरुंद रस्त्यांमुळे दररोज येणाऱ्या राडारोड्याच्या गाड्यांमुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण? असे प्रश्न विभागप्रमुख उदेश पाटेकर, माजी नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी उपस्थित केले. यावेळी पालिका प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले.