मुंबई व महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीला खड्डय़ात घालण्याचे महायुतीचे षड्यंत्र; बेस्ट, एसटीला वाचवण्यासाठी शिवसेनेचा उग्र आंदोलनाचा इशारा

मुंबईची जीवनवाहिनी ‘बेस्ट’ बससेवा आणि महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या ‘एसटी’ला खड्डय़ात घालण्याचे षड्यंत्र महायुती सरकारने रचले आहे. सरकारचे हे षड्यंत्र हाणून बेस्ट आणि एसटीला वाचवण्यासाठी शिवसेना उग्र आंदोलन करेल, असा इशारा शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी गुरुवारी दिला. तसेच लाखो वीज ग्राहकांच्या घरी ‘अदानी’चे विद्युत स्मार्ट मीटर लावण्यासाठी बेस्टच्या महाव्यवस्थापकांमार्फत सुरू असलेली दादागिरी खपवून घेणार नसल्याचेही त्यांनी महायुती सरकारला ठणकावले.

दहा हजार कोटी रुपयांच्या कर्जाच्या बोज्याखाली दबलेली बेस्ट बससेवा, ‘अदानी’चे विद्युत स्मार्ट मीटर लावण्यासाठी जबरदस्ती, एसटीची कोलमडलेली आर्थिक घडी या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि बेस्ट कामगार सेनेने गुरुवारी दादरमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी शिवसेना उपनेत्या-विभाग संघटक किशोरी पेडणेकर, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत उपस्थित होते. सध्या बेस्ट उपक्रम व एसटी महामंडळाला संपवण्याचे काम सुरू आहे. बेस्टचे खासगीकरण केले जातेय. वास्तविक, परिवहन, दूरसंचार, आरोग्य, शिक्षण या खात्यांची जबाबदारी पूर्णपणे सरकारने घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.

महायुतीने एसटी डबघाईला आणलीय!

महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, अनिल परब यांनी एसटीसाठी मनापासून काम केले. एसटीला 10-10 हजार कोटी रुपये आणून दिले. मात्र सद्यस्थितीत महायुती सरकारने एसटी डबघाईला आणलीय, एसटी बँकेलाही तोटय़ात घातलेय.

बेस्टला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे

केंद्र सरकारने मूळ अर्थसंकल्पात रेल्वेला अंतर्भूत केले. त्याचप्रमाणे बेस्टला मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात समाविष्ट केले पाहिजे. कंत्राटदार कंपन्यांना ज्यावेळी सेवा देता येत नाही त्यावेळी ते बेस्टच्या मूळ कर्मचाऱ्यांची मदत घेतात. त्यांच्या मदतीला आमचाच ड्रायव्हर जाणार आणि दंडही आम्हीच भरणार हा उलटा व्याप अनाकलनीय आहे. यात बेस्टचे प्रचंड नुकसान होत असून बेस्टला जाणीवपूर्वक खड्डय़ात घालण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत बेस्टला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.