24 तासांत पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा शिवसेना स्टाईल तीव्र आंदोलन

पालिकेच्या आर/उत्तर दहिसर विभागात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे दहिसरकरांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज आर/उत्तर विभाग कार्यालयावर धडक देत 24 तासांत पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा शिवसेना स्टाईल तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा उपनेते विनोद घोसाळकर यांनी दिला.

दहिसर विधानसभाअंतर्गत मराठा कॉलनी, शास्त्रीनगर, नवागाव, दहिसर गावठण, आझादनगर येथे कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा व पाणी वेळेत न सोडता तासभर उशिरा होणारा पाणीपुरवठा, नळावाटे येणारे दूषित व गढूळ पाणी अशा तक्रारी शिवसेनेकडे येत आहेत. याची गंभीर दखल घेत माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला आघाडीच्या महिलांनी आर उत्तर कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या धडक मोर्चाला उपनेत्या संजना घाडी, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, दीक्षा कारकर, शर्मिला पाटील, विधानसभा संघटक डॉ. हेमांगी राऊत, विधानसभा समन्वयक दीपाली चुरी, ज्युडीत मेंडोसा, कुंदा भरणे, ममता मसुरकर, मानसी महातले आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशासनाला धरले धारेवर

महिलांचा धडक मोर्चा झाल्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आर उत्तर विभाग कार्यालयात पाण्याच्या सर्व समस्येच्या संदर्भात निवेदन सादर करीत प्रशासनाला धारेवर धरले. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सर्व रिक्त जागा तातडीने भरून पाणीपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी माजी आमदार विनोद घोसाळकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर आणि महिला पदाधिकाऱ्यांसह यांच्यासह उपविभागप्रमुख विनायक सामंत, अविनाश लाड, कर्णा आमीन, सुधाकर राणे, अक्षय राऊत, राजेंद्र इंदुलकर, प्रवीण कोळेकर, संदीप नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी आणि रहिवासी उपस्थित होते.