
कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे डोंबिवली पूर्व भागात उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालनाची दुरवस्था झाली आहे. या कलादालनात कचरा आणि धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या दालनाची त्वरित साफसफाई आणि दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहरप्रमुख अभिजित सावंत यांनी दिला आहे.
डोंबिवली पूर्व भागातील शिवमंदिर स्मशानभूमीच्या शेजारी महापालिकेच्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्यात आले आहे. हे कलादालन गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. या कलादालनाची कोणतीही साफसफाई केली जात नाही. कलादालनाजवळ झाडे आणि झुडपे वाढली आहेत. पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे कलादालनाची अवस्था दयनिय झाली आहे.
कलादालन हस्तांतरित करा
कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाला जर या कलादालनाची निगा राखता येत नसेत तर त्यांनी हे कलादालन शिवसेना पक्षाकडे हस्तांतरित करावे, अशी मागणी शहरप्रमुख अभिजित सावंत यांनी केली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड तसेच मालमत्ता विभागाच्या उपायुक्तांना दिलेल्या पत्रात या कलादालनाकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेने या कलादालनाची त्वरित देखभाल-दुरुस्ती करावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सावंत यांनी दिला आहे.