माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का? शिवसेनेच्या सरपंचाचा पोलिसांना सवाल

बीड जिल्ह्यातील ‘मस्साजोग’ या ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या झाल्यानंतरही कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे रोज निघत आहेत. उरण तालुक्यातील पागोटे या गावात धुडगूस घालणाऱ्या गावगुंडांवर न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पण अजूनही हे गावगुंड मोकाट असून त्यांना अटक करण्यात आलेली नाही. माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघत आहात काय, असा संतप्त सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच कुणाल पाटील यांनी पोलिसांना केला आहे. या गावगुंडांच्या दहशतीमुळे ग्रामस्थ कमालीचे घाबरले असून उरण तालुका ‘मस्साजोग’च्या वाटेवर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पागोटेवासीयांना न्याय केव्हा मिळणार असा, प्रश्न निर्माण झाला आहे.

‘मस्साजोग’ या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. विधिमंडळातही सर्वपक्षीय आमदारांनी आवाज उठवला. कोणत्याही परिस्थितीत या गावगुंडांच्या मुसक्या आवळू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणाभीमदेवी थाटात दिले. पण उरण तालुक्यात मात्र मस्साजोगसारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

■ हे आहेत गावगुंड

पागोटे ग्रामपंचायत हद्दीत महेश पंडित, किरण पंडित, सौरभ पाटील, जितेंद्र पाटील, सनी कैकाडी, मेघदूत कैकाडी या गुंडांनी अक्षरशः हैदोस घातला. त्यांच्यावर गोदामात चोऱ्या करणे, खंडणी, मारामारीचे गुन्हे दाखल झाले आहेत. तरीदेखील पोलिसांनी कारवाई केलेली नाही.

हल्ल्यातून बचावले

गावगुंडांच्या दहशतीमुळे ग्रामस्थांना गावात फिरणेही मुश्कील झाले आहे. पागोटे गावचे शिवसेना सरपंच कुणाल पाटील यांनी या दहशतीविरोधात एल्गार पुकारला आणि जनजागृती मोहीम सुरू केली. त्यामुळे हे गुंड संतापले आणि ९ ऑक्टोबर रोजी पाटील यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. केवळ दैव बलवत्तर म्हणून ते बचावले. सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याचे बघताच हल्लेखोर गुंडांनी पळ काढला.

– शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या पागोटे ग्रामपंचायतीच्या सरपंच कुणाल पाटील यांनी हल्ल्यानंतर थेट उरण पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. मात्र त्याची गंभीर दखल न घेता अदखलपात्र तक्रार दाखल करून घेत गावगुंडांना खुलेआम फिरण्याची जणू संधीच दिली.

– सरपंचावर प्राणघातक हल्ला होऊनही हे हल्लेखोर गावात मोकाट आहेत. पोलिसांकडे न्याय न मिळाल्याने कुणाल पाटील यांनी अखेर न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने तातडीने या सर्वांना अटक करावी असे आदेश दिले

कुणाचा राजकीय आशीर्वाद?

न्यायालयाचे आदेशदेखील पोलिसांनी झुगारले असून सर्व गुंड बिनधास्त फिरत आहेत. त्यांच्यामुळे माझ्या जीवाला धोका असल्याचा आरोप सरपंच पाटील यांनी केला असून मस्साजोगसारखी घटना घडल्यानंतर अटक करणार काय, असा थेट सवाल त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. या गुंडांना कुणाचा राजकीय आशीर्वाद आहे, असा प्रश्नही संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.