आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असं हे भाजपवाले बोलतात. तुम्ही विश्वासघात केला म्हणून आम्हाला काँग्रेससोबत जावं लागलं. पण जेव्हा जम्मू कश्मीरमध्ये तुम्ही मेहबुबा मुफ्तीसोबत बसला होतात तेव्हा तुमचं हिंदुत्व व बुद्धी गहाण टाकलेलं का ? असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी व शहांवर केला आहे. मंगळवारी उमरगा येथे पार पडलेल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोदी शहांवर जोरदार टीका केली.
”हे मिंधे सरकार महाराष्ट्राला गुजरातचा गुलाम करतायत. माझे गुजरातशी किंवा गुजराती लोकांशी काही वैर नाही. पण मोदी आणि शहा आपल्यात एक भिंत बांधत आहेत. हे जातील पण ती भिंत कायम राहिली तर काय करायचं? गेली अनेक वर्ष गुजराती संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाने राहतायत. का आमच्या मध्ये ही भिंत उभी करतायत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
”नांदेडच्या सभेत मोदींनी शिवसेनाप्रमुखांचे खूप कौतुक केलं. याचाच अर्थ मोदींना देखील महाराष्ट्राकडे मतांचा जोगवा मागायला हिंदुहृदयसम्राटांचं नाव घ्यावं लागतं. ही बाळासाहेबांची पुण्याई आहे. लोकसभेत मोदी गॅरंटीचा तर कचरा झाला आहे. आता या महाराष्ट्रात मोदी गॅरंटी चालत नाही. अमित शहा म्हणतात की ज्यांचा 370 कलम हटवायला विरोध होता उद्धवजी त्यांच्यासोबत तुम्ही बसला आहेत. मला अमित शहांना सांगायचे आहे की शहाजी 370 कलम हटवला तेव्हा शिवसेना तुमच्यासोबत बसली होती. शहाजी इथे एक आदिवासी तेल मिळतं ते वापरा. त्याने तुमची दोन्ही कामं होतील. तुम्ही विश्वासघात केला म्हणून आम्हाला काँग्रेससोबत जावं लागलं. पण जेव्हा कश्मीरमध्ये तुम्ही मेहबुबा मुफ्तीसोबत बसला होतात तेव्हा तुमचं हिंदुत्व व बुद्धी गहाण टाकलेलं का ? असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी हिंदू पंडितांवर होत असलेल्या अत्याचारांच्या वेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कशा प्रकारे त्यांना आसरा दिला होता त्याबद्दलही सांगितले. ”जेव्हा जम्मू कश्मीरमध्ये हिंदू पंडितांच्या हत्या होत होत्या. जेव्हा त्यांना निर्वासितांचं जीन जगावं लागत होतं. तेव्हा अमित शहा व नरेंद्र मोदी नावाची माणसं देखील या देशात आहेत हे लोकांना माहित देखील नव्हती. त्यावेळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनी त्या तमाम हिंदू पंडितांना महाराष्ट्रात आसरा दिला होता. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू”, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले.
”370 कलम हा महाराष्ट्रातल्या विधानसभेतला मुद्दा नाही होऊ शकत. काश्मीरचा मुद्दा होऊ शकतो. अमित शहांनी 370 कलम काढूनही शेतकरी आनंदात नाही. काश्मीरमधील 370 काढल्याने माझ्या महाराष्ट्रातील कापसाला भाव नाही मिळाला. कश्मीरमधलं 370 कलम काढलं म्हणून जे उद्योगधंदे गुजरातला पळवले ते नाही थांबले. महाराष्ट्रातल्या विधानसभेत काश्मीरच्या 370 कलम हटवल्याचा प्रश्न येतो कुठे. इथे लोकांच्या मुलभूत प्रश्नांबद्दल बोलायला हवे. कोरोना काळात तुम्ही सगळ्यांनी धीराने संकटाचा सामना केला. मी जे सांगत होतो ते ते तुम्ही करत होता. म्हणून महाराष्ट्र वाचला. त्यावेळी मोदी शहा भाजपने महाराष्ट्र नाही वाचला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
” यांच्या महाराष्ट्र लुटण्याआड पहाडासारखं कुणी उभं राहू शकत असेल तर ती हिंदुहृदयसम्राटांची शिवसेना व त्यांचा पुत्र उद्धव ठाकरे आहे म्हणून आम्ही चांगलं काम करत असताना आमचं सरकार पाडलं. म्हणून हे उद्धव ठाकरे यांना संपवायला निघाले आहेत. मला मुख्यमंत्री बनायचे आहे म्हणून हे सगळं सुरू नाहीए. जेव्हा यांनी सरकार पाडलं तेव्हा अक्षरश: नेसत्या वस्त्रानिशी आम्ही वर्षा सोडला. कारण मातोश्रीचं प्रेम, महाराष्ट्र ही माझी आई आहे. मला मुख्यमंत्रीपदापेक्षा मला तुमचं प्रेम महत्त्वाचं आहे. एकतरी उदाहरण मला दाखवा की ज्याच्याकडे पक्ष नाही, यंत्रणा नाही, त्याच्यासाठी एवढे लोक येतायत. तुम्ही सगळे जमलायत ते आई तुळजाभवानी व माझ्या आईवडिलांनी दिलेले आशीर्वाद आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.