राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. पोलीस ठाण्यात गोळीबार होतो, महिला-मुलींवर अत्याचार होत आहेत. हे अत्याचार रोखण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले. ‘लाडकी बहीण योजना’ राववता, मात्र आपल्याच बहिणीविरोधात निवडणूक लढवता, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी लगावला.
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारासाठी वाडा येथे आयोजित केलेल्या सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा राजमाला बुट्टे पाटील, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, अशोक खांडेभराड, शरद पवार गटाचे अतुल देशमुख, शिवसेना महिला आघाडीच्या विजया शिंदे, लक्ष्मण टोपे, अमोल पवार, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी, आरपीआयचे आठवले गटाचे संतोषनाना डोळस, तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, वंदना सातपुते, पूनम पोतले, सुधीर मुंगसे, संजय घनवट, सुनील धंद्रे, सुरेश चव्हाण, सयाजी मोहिते, अनुराग जैद, महेंद्र गोरे, श्रद्धा सांडभोर, तनुजा घनवट, सरपंच रूपाली मोरे, रघुनाथ लाडंगे, नीलेश कड उपस्थित होते.
याप्रसंगी आरपीआय आठवले गटाचे संतोष नाना डोळस यांनी पाठिंबा जाहीर केला.
आम्हाला आमच्या बहिणींना आर्थिक सक्षम करण्याबरोबरच त्यांना सुरक्षित करायचे आहे. काळे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहनही अंधारे यांनी केले.
अतुल देशमुख म्हणाले, ‘आमदार बदलण्याचा निर्धार तालुक्यातील सर्वांनीच केला आहे. महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी यासाठी एकजुटीने काळे यांच्या पाठीशी उभे आहेत.’
बाबाजी काळे म्हणाले, ‘आमदार मोहिते यांना जनता घरचा रस्ता दाखवेल, असा विश्वास आहे. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी माझ्या पदाचा उपयोग जनतेसाठी केला. मी आतापर्यंत समाजासाठी काम केले. आता विधिमंडळात जाण्यासाठी तालुक्यातील सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.’ यावेळी काळे यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर टीका केली.
यावेळी तालुकाप्रमुख रामदास धनवटे, सुधीर मुंगसे, विजयाताई शिंदे, अतुल देशमुख, उमेदवार बाबाजी काळे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन सुदाम कराळे यांनी केले, तर आभार अमोल दौंडकर यांनी मानले.
पुरोगामी महाराष्ट्रात बहिणीला भाऊ नेहमीच मदतीचा हात देत असतात; मात्र बहिणीला मदत केली म्हणून बॅनरबाजी करीत नाहीत, असा टोलाही अंधारे यांनी महायुती सरकारला लगावला.