ठाण्यात मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा; राजन विचारे यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

बोगस मतदारांची नावे अद्याप वगळण्यात आली नसल्याने लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही फटका बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी ठाण्यातील सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात प्रत्येक केंद्रांवर बोगस मतदानाची संख्या मोठ्या प्रमाणात निदर्शनास आली आहे. याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोग सपशेल फेल ठरले आहेत. याप्रकरणी शिवसेना नेते, तसेच ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली बोगस आणि दुबार नावांची पुराव्यासह यादी देण्यात आली. मात्र त्यानंतरही मतदार यादीतून नावे वगळण्यात आली नसल्याने बोगस मतदान होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे विधानसभा क्षेत्रातील एकूण 407 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी विचारे यांनी केली आहे.