भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या तोंडावर जाहीरनामा काढला आहे. पूर्ण होऊ न शकणाऱया अशक्यप्राय गोष्टींचा त्यात समावेश करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. 2014 आणि 2019लाही असाच जाहीरनामा काढला होता. पण आताच्या निवडणुकीनंतर भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही. त्यामुळे त्यांना वाट्टेल ते बोलण्याचा अधिकार आहे आणि तो कायम रहावा म्हणूनच लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतोय, असा जोरदार तडाखा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषदेत लगावला.
भंडारा येथील प्रचार सभेत अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली असा आरोप केला होता. त्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. पक्ष फोडाफोडीच्या बाता मारण्यापेक्षा तुमच्या पुत्रप्रेमामुळे हिंदुस्थानी संघ हरला त्याबद्दल बोला, मी तसे देशविरोधी पुत्रप्रेम दाखवलेले नाही, असे उद्धव ठाकरे अमित शहा यांना उद्देशून म्हणाले. अमित शहा यांचे पुत्र जय शहा हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष आहेत. गेल्या वर्षी हिंदुस्थानात झालेला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना मुंबई, दिल्ली, कोलकाताच्या मैदानाऐवजी बीसीसीआयने गुजरातच्या नरेंद्र मोदी मैदानावर घेतला होता. त्या सामन्यात हिंदुस्थानचा लाजिरवाणा पराभव झाला होता.
उद्धव ठाकरे यांनी या वेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही शरसंधान केले. अमित शहा आणि त्यांच्या चेल्याचपाटय़ांनी बोलण्यामध्ये एकवाक्यता ठेवली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. अमित शहा बोलतात, त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पह्डली नाही आणि दुसरीकडे ‘मी पुन्हा येईन’ बोलणारे फडणवीस यांनी ‘दोन पक्ष पह्डून पुन्हा आलो’ असे वक्तव्य केले होते, त्यामुळे शहांचे चेलेचपाटेच त्यांची लाज काढत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सत्ता येऊ दे, दुहेरी कराच्या फटक्यातून बाहेर काढू
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पनवेल आणि कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना दुहेरी कराच्या फटक्यातून बाहेर काढू, असे आश्वासन या वेळी उद्धव ठाकरे यांनी दिले. सिडको आणि महानगरपालिका अशा दोघांकडून तिथे करवसुली केली जात आहे. मालमत्ता कर भरू नये असे कुणाचे म्हणणे नाही, पण ही दुहेरी करवसुली म्हणजे जुलूमशाही आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
एका बाजूला जुलूम जबरदस्तीने करवसुली केली जात आहे आणि दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीत लोढांच्या पलावा सिटीला करमुक्ती दिली जात आहे. या विषमतेविरुद्ध तेथील सुमारे 2 लाख 80 हजार लोक गेले कित्येक महिने आंदोलन करत आहेत. मात्र सरकारकडून त्यांना न्याय मिळत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
लवकरच संयुक्त सभांचा धडाका
महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा कधी सुरू होणार, या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अजून काही ठिकाणी कॉंग्रेसकडून उमेदवार जाहीर व्हायचे आहेत, तसेच राज्यासाठी काही वचननामा द्यायचा का? यावरही महाविकास आघाडी विचारविमर्श करत आहे. दोन-तीन दिवसांत त्यावर निर्णय होऊन सभा सुरू होतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
– अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबाराचा उल्लेख करत माध्यमांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर घटनाबाह्य मिंधे सरकारच्या राजवटीत खुलेआम गुंडागर्दी सुरू असून सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. कोणी कुठेही जाऊन गोळीबार करताहेत आणि त्यांना रोखण्याची सरकारमध्ये हिंमत नाही. त्यानंतरही मते मागत फिरताहेत ही लाजिरवाणी बाब आहे, असे ते पुढे म्हणाले.