”जखमी वाघ काय असतो व त्याचा पंजा काय करतो ते तुम्हाला भविष्यात दिसेल. त्यामुळे मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंजेबाला झुकवलं तिथे अमित शहा किस झाड की पत्ती आहे, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फटकारले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेनेचा विराट मेळावा अंधेरी येथे पार पडला. या मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप, नरेंद्र मोदी, अमित शहा व गद्दार मिंध्यांना फटकारले आहे.
”अमित शहा तुम्ही माझी जागा ठरवू शकत नाही. माझी जागा ही माझी शिवसेनाप्रमुखांनी दिलेली ही अस्सल वडिलोपार्जित संपत्ती आहे. शिवसेना प्रमुख म्हणायचे जो पर्यंत शिवसैनिक आहेत तोपर्यंत मी शिवसेनाप्रमुख आहे. तसंच मी सांगतो जोपर्यंत शिवसैनिक आहेत तोपर्यंत मी शिवसेना पक्षप्रमुख आहे. गद्दारांनी वार केले तरी हा उद्धव ठाकरे संपणार नाही. गद्दारांना गाडूनच मी संपेन. ज्या दिवशी माझा एक जरी निष्ठावंत शिवसैनिक बोलला तू बाळासाहेबांचे विचार सोडले बाजूला हो. त्या क्षणी जसं मी मुख्यमंत्रीपद सोडलं तसं हे पक्षप्रमुख पद सोडल्याशिवाय राहणार नाही. पण मला खात्री आहे संपूर्ण महाराष्ट्र मला त्यांचा कुटुंबप्रमुख मानतो. तो महाराष्ट्र माझ्याशी इतका निष्ठूरपणे वागू शकत नाही. हार जित असू शकतो. जसा पराभव आम्हाला धक्का देणारा होता. तसा भाजपच्या अनेक लोकांना हा विजय धक्कादायक होता. आपण जिंकलो कसे असा प्रश्न अनेकांना होता. ज्या अमित शहांनी सरकारी यंत्रणा वापरून आपल्या महाराष्ट्रावर घटनाबाह्य सरकार लादलं ते असा तसा महाराष्ट्र आपल्या हातून सुटू देतील. महाराष्ट्राने मोदींच्या अश्वमेधाचं गाढव ज्या लोकसभेत प्रकारे अडवलं तो फटका अजूनही वर्मी घाव बसलाय त्यातून ते उठत नाहीए. ज्या क्षणी महाराष्ट्र आपल्या हातून जाईल तेव्हा दिल्ली कोलमडणार आहे. जर महाराष्ट्राचा निकाल सर्व जनतेच्या मनासारखा लागला असता तर आज दिल्लीचं सरकार कोलमडलेलं दि्सलं असतं ही महाराष्ट्राची ताकद आहे. मिठी माराल तर प्रेमाने मारू व पाठीत वार केला तर वाघनखं काढू हा महाराष्ट्र आहे आणि ही महाराजांची शिकवण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेची हा पहिलाच जाहीर मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आले होते. अंधेरीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पार पडलेल्या या सभेला तुफान गर्दी झाली होती. ‘आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे’, ‘आम्ही निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे’ जय भवानी जय शिवाजी, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जयघोष करत शिवसैनिक मैदानात दाखल झाले होते.
”अमित शहाजी तुम्ही शरद पवारांनी 1978 साली केलेल्या प्रयोगाबाबत बोललात. त्यावेळी शरद पवारांनी पुलदचा प्रयोग केला होता. ती जी दगाबाजी केली होती. त्या दगाबाजीत जनता पक्ष मोडून भाजप देखील त्यात सामील होता. त्यांचे हसू आडवाणी त्या पुलदच्या सरकारमध्ये मंत्री होते. दगाबाजीचं राजकारण तुम्ही सुरू केलं. तुम्ही त्याला खतपाणी घातलंय. जनता पक्ष सुद्धा जो इंदिरा गांधींच्या आणिबाणीविरोधात निवडून आलेला होता. तो जनता पक्ष फोडण्यात तेव्हाचा जनसंघ आघाडीवर होता. ही दगाबाजीचं बीजं तुमच्यामध्ये आहेत. आमच्या महाराष्ट्रात नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”पंकजा मुंडे विधानसभेच्या काळात बोलल्या होत्या भाजपचं सगळं वेगळं असतं, विधानसभेसाठी गुजरातमधून 90 हजार लोकं आणली. काही जण म्हणतात ते संघाचे कार्यकर्ते होते. आता ते 90 हजार कुठे गेले? शिवसैनिक आपत्तीकाळात मुंबईकरांच्या जीवाला जीव देतो. जीव वाचवतो. तसे ते 90 हजार आता धावून येतील का? मुलाला शाळेत अॅडमिशन पाहिजे, दंगली झाल्यातय. रक्त पाहिजे तर हे संघवाले देतील का? हे जे 90 हजार आणले होते ते उपरे आणले होते त्यातून एकाला जरी विचारलं की रक्तदान करेल का तर तो गोमूत्रदान करतो असे सांगेल. शिवसैनिकाकडे आला तर शिवसैनिक जात पात न बघता रक्तदान करेल. जर ते कार्यकर्ते संघाचे असतील तर ते म्हणतील रक्त नव्हे आम्ही गोमूत्र देतो. ते मद्रास आयआयटीचे संचालक कामकोटी त्यांनी म्हटलं की मी तापाने फणफणत होते तेव्हा गोमूत्र पिऊन बरे झाले. धन्य आहे त्यांची. अशी माणसं काय शिकतात, असा मिश्किल सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
”आपण जे काही करतोय त्याबाबत मुंबईकर कधी निष्ठूर होऊ शकत नाही. शिवसेनेशी गद्दार होऊ शकत नाही. मी लढतोय ते तुमच्या ताकदीमुळे. वांद्र्याला तिकडे गद्दारांचा मेळावा सुरू आहे. आपली ही सभा झाल्यावर ते राजकारणातले गद्दार चिरकणार. त्यांचं कामच ते आहे. स्वत:चे विचार तर त्यांना नाही. गद्दारांना विचारायचं आहे की तुम्ही काय करताय? तुमच्या हाताता चाकू देऊन महाराष्ट्राच्या मातेचा अस्मितेचा वध करतायत. पैसे घेऊन जाताय जा. आज कदाचित तुम्ही जिंकला असं वाटत असेल. दोघांमधला फरक पाहा. आज आम्ही हरलो तरी जनता कशी स्वागत करतेय हळहळतेय. गद्दार जिंकले असतील त्यांना जिंकवणाऱ्या अमित शहांनी यंत्रणा वापरल्या. अमित शहा आहेत तोपर्यंत तुमचं तिथे बसणं आहे. एकदा महापालिका निवडणूका झाल्या त्यानंतर बघा तुमची काय अवस्था होतेय. आताही दिसायला लागलं आहे. ज्या पद्धतीची वागणूक अडीच वर्ष यांना मिळत होती आणि आता बसायचं तर बसा नाहीतर जा गावी निघून. रुसू बाई रुसू गावात बसू. तसं यांचं झालंय. पाहिजे ते मंत्रीपद मिळत नाही, रुसले गेले गावी, दावोसला नेले नाही, गेले गावी. आता डोळ्यातले आसू दिसायला लागले आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मिंध्यांना लगावला.
”बरोबर एक वर्षापूर्वी अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. अजूनही त्या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं नाही. काय उन्माद सुरू आहे. बाबरी पाडली तेव्हा जर शिवसैनिक उतरले नसते तर तुम्ही आता इथे नसतातच. जय श्री राम जसं आम्ही बोलतो तसं जय शिवराय देखील बोलावच लागेल. महाराष्ट्रात तुम्हाला जय भवानी जय शिवाजी देखील बोलावंच लागेल. जय श्री रामच्या सोबत जय शिवराय बोलावंच लागेल. आमचं दैवत शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर मोदी काय कुणीच जय श्री राम बोलू शकले नसते. म्हणून आधी त्यांचा जयजयकार करा. महाराष्ट्रात तरी मी जय शिवराय आधी व नंतर जय श्री रामच बोलणार. आम्ही भाजपसारखे कृतघ्न नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन नसतं केलं, संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येनंतर सव्वीस वर्ष ताराराणीने औरंगझेबाला झुंजवत ठेवला नसता तर गुजरात सारखे औरंगजेबाच्या चरणी लीन झाले असते. संपूर्ण देश हिरवा झाला असता. जर तुम्ही कुणाला जय श्री राम बोलले त्याला सांगायचं आधी जय शिवराय मग जय श्रीराम, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
” निवडणूक जिंकला म्हणून महाराष्ट्र नाही संपत. आपल्याला उपरे नाही हरवू शकत, आपल्यातले गद्दारच आपल्यावर वार करतायत. मिर्झा राजे जयसिंग देखील हिंदूच होता एवढं सैन्य घेऊन आला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आग्र्याला जावं लागलं होतं. त्यानंतर सुटून येऊन औरंगजेबाच्या छाताडावर हिंदवी स्वराज्याचा झेंडा रोवणारा हा महाराष्ट्र आहे. रामदास स्वामींनी सांगितलं की मराठा तेतूका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा. हाच महाराष्ट्र धर्म देशाचं व हिंदुत्वाचं रक्षण करतो. आम्ही हिंदू आहोत पण महाराष्ट्र व मराठीच्या मूळावर येणारं हिंदुत्व आमचं नाही. हिंदुत्वाच्या बुरख्या आडून महाराष्ट्राची अस्मिता खत्म करण्याचा प्रयत्न केला तर कडवड हिंदू म्हणून तुमच्या समोर उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. जसा मी हिंदू अभिमान आहे तसा मी मराठी अभिमानी देखील आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.