रविवारी महायुतीतील 33 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली मात्र शपथ घेऊन दोन दिवस झाले तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. मंत्रीपदातून छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आले आहे. शपथविधीनंतर अनेक आमदारांनी वेगेवगळ्या प्रकारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना जोरदार टोला लगावला आहे.
”आपल्या विधीमंडळाचं अधिवेशन सुरू जालेले आहे. नवीन सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे. अडीच वर्ष घटनाबाह्य सरकार पाहिलं. त्यानंतर जो निकाल लागला तो अनाकलनीय आहे. जनतेत या सरकारला ईव्हीएम सरकार म्हंटलं जातंय. ईव्हीएम सरकारचं हे पहिलं अधिवेशन आहे. नाईलाजाने जनता आता या सरकारकडून अपेक्षा करतेय. जो काही निवडणूकीचा निकाल लागला त्या विरोधात आंदोलनं सुरू आहेत. त्यामुळे विजयाचा आनंद कुठे दिसला नाही. काल परवा मंत्रीमंडळाचा विस्तार जरूर झाला पण विस्तारापेक्षा मंत्रीमंडळाच्या वजाबाकीची चर्चा अधिक रंगली आहे. मंत्रीमंडळात ज्यांना स्थान मिळालं त्यांच्या फटाक्यापेक्षा नाराजांचे बार जोरात वाजतायत”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
”नवीन सरकार आल्यानंतर मंत्रीमंडळाचे प्रमुख म्हणजेच माननीय मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांचा परिचय सभागृहाला करून देतात. ज्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे वेगळ्या गुन्ह्यांचे ढिगभर पुरावे असल्याचे सांगितले. त्यांच्यावर ईडी इनकमटॅक्सच्या धाडी पडल्या त्यांची सन्माननीय मुख्यमत्र्यांना त्यांचे सहकारी म्हणून ओळख करून द्यावी लागली”, असाही टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला
”या सरकारने निवडणूकीआधी लाडकी बहिण योजना जाहीर केली होती. त्या बहिणीपेक्षा सध्या लाडक्या आमदारांचीच चर्चा सुरू आहे. पहिल्या पाच महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत. दरम्यान त्यानंतर या सरकारनेच निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पुढचे पैसे द्यावे लागू नये म्हणून स्थगिती आणली. आता निवडणूका झाल्या आहेत. त्यामुळे आता त्यांनी पुन्हा ही योजना सुरू केली पाहिजे. 2100 रुपयांनी जे काही मागचे महिने बाकी राहिले आहेत. त्यातही आवडती नावडती न करता सगळ्या महिलांना दिले गेले पाहिजे. बहिणींमध्ये आता तुम्ही आवड़ती नावडती करू शकणार नाही. आता हे निकष बाजूला देऊन, 2100 नुसार तत्काळ आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
‘राज्यपालांनी त्यांच्या भाषणात पर्यावरणाबाबत पुसटसा उल्लेख केला. त्यांनी पर्यावरणाबाबत एक समिती नेमणार असल्याचे सांगितले. आरे कारशेडसाठी जशाप्रकारे झाडांची कत्तल झाली. तसंच डोंगरीच्या कारशेडसाठी 1400 झाडांची कत्तल होणार आहे. ही कत्तल तज्ञांची समिती होऊ देणार आहे का? महिलांच्या सुरक्षेबाबत मला त्या भाषणात काही आढळलं नाही. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. अधिवेशन सुरू जालं आहे. बिनखात्याचे मंत्री आहेत. कोणावर कोणती जबाबदारी आहे ते माहीत नाही. कुणीही उठतंय उत्तर देतंय. नुसतं एक गंमत म्हणून अधिवेशन घेतलं जातंय तर ही लोकशाहीची थट्टा आहे. लवकरात लवकर खातेवाटप व्हायला पाहिजे होता. एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला वेळ लागला. मंत्रीमंडळ विस्ताराला वेळ लागला. खातेवाटपा झालेलं नाही. कोणताही मंत्री कोणत्याही प्रश्नाला उत्तर देतोय. काय चाललंय काही कळत नाही. मग हे अधिवेशन घेतलंच कशाला, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.