मोदींच्या 1200 कोटींच्या विकासाला गळती! नव्या संसद भवनावरून शिवसेनेचा जोरदार टोला

केंद्र सरकारने तब्बल 1200 कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या नव्या संसद भवनाचे पहिल्याच पावसात छत गळू लागले आहे. संसद भवनात काही ठिकाणी छताला नळासारखी धार लागली असून भवनातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी बादल्या लावल्या आहेत. या गळतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांनी यावरून केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे.

बुधवारी संध्याकाळी संसद भवन परिसरात झालेल्या मुसळधार पावसानंतर भवन परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही वेळात संसद भवनाच्या इमारतीच्या आत पाणी गळती होत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. या व्हायरल व्हिडीओ वरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकावर टीकेची झोड उठवली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने देखील त्यांच्या एक्स अकाऊंटवरून नरेंद्र मोदींच्या या महत्त्वकाक्षी प्रोजेक्टवर टीका केली आहे. शिवसेनेने नव्या संसद भवनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यासोबत ” मोदींच्या 1200 कोटींच्या विकासाला गळती”, असा टोला लगावला आहे.