सत्तेचा माज… म्हणून मुलाला राहिला नाही कायद्याचा धाक! शिवसेनेची बावनकुळेंवर टीका

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या भरधाव ऑडी कारने एकामागोमाग पाच वाहनांना उडवले. या भीषण अपघातात दोन तरुण जखमी झाले असून वाहनांचा चेंदामेंदा झाला. या घटनेने भेदरलेला संकेत आणि त्याचा एक मित्र पळून गेला तर अन्य दोन जणांना पोलिसांनी अटक केली. हे प्रकरण दाबण्याचा सध्या सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी ऑडीची नंबर प्लेट हटवण्यात आली तसेच पोलिसांनी ड्रायव्हरचीही अदलाबदली केल्याची चर्चा आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून यावरून जोरदार टीका करण्यात आली आहे. ”सत्तेचा माज म्हणून मुलाला राहिला नाही कायद्याचा धाक. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या भरधाव ऑडी कारने एकामागोमाग पाच वाहनांना उडवले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवल्या आहेत. तेव्हा आता मिंधे- भाजप सरकार याला कायदा समान लावेल का? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

संकेत बावनकुळे आणि त्याचे तीन मित्र या आलिशान ऑडी कारने नागपूरच्या धरमपेठेतील लाहोरी येथे गेले होते. तिथे त्यांनी जेवण केले. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास चौघेही एमएच 40-सीवाय-4040 या क्रमांकाच्या ऑडी कारने रामदास पेठकडे आले. यादरम्यान ऑडीने जितेंद्र सोनकांबळे यांच्या एमएच-31-ईके-3939 या क्रमांकाच्या कारला धडक दिली. त्यानंतर एका मोपेडला ठोकले. त्यावरील दोन तरुण या धडकेत जखमी झाले. ऑडीचा वेग इतका होता की तिने मानकापूरच्या दिशेने जाणाऱया अन्य तीन वाहनांनाही धडक दिली. त्यात एमएच-49-झेड-8637 या क्रमांकाच्या कारचा समावेश आहे. त्यानंतर एका पोलो कारलाही जोरदार धडक दिली. पोलो कारच्या चालकाने ऑडीचा पाठलाग करून ती माणकापूर कुलावर थांबवण्यास भाग पाडले.

माणकापूर कुलावर ऑडी थांबताच संकेत आणि त्याचा एक मित्र कारमधून बाहेर उडी टाकून पळून गेले. कारमधील अर्जुन हावरे आणि रोहित चित्तमवार या दोघांना पकडून तहसील पोलीस ठाण्यात नेण्यात आले. नंतर त्यांना सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अर्जुन हा अभियंता असून सरकारी पंत्राटदार आहे तर रोनित याचा ट्रान्सफॉर्मरचा व्यवसाय आहे. जितेंद्र सोनकांबळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंद केला.

सदरहू ऑडी कारमधील चार लोक धरमपेठमधील एका बीअर बारमधून बाहेर पडले होते. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला असे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्यातून दिले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन जणांना नंतर वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. ऑडी कार कुठून निघाली आणि वाहनांना उडवत कशी धरमपेठपासून माणकापूरपर्यंत कशी आली त्याचे सीसीटीव्ही मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.