आनंदाचा शिधाच्या माध्यमातूनही लाडक्या मित्र कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट, शिवसेनेची टीका

गौरी गणपतीसाठी राज्य सरकारने जनतेला आनंदाचा शिधा देणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान या आनंदाच्या शिधासाठी मर्जीतल्या कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी निविदेत अटींमध्ये फेरफार केल्याचे समोर आले आहे. त्यावर आक्षेप घेत तीन कंपन्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावरून न्यायालयाने मिंधे सरकारला धारेवर धरले आहे. याप्रकारावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज्य सरकारला फटकारले आहे. ”मिंधे भाजप सरकारचा आनंदाचा शिधा हा जनतेसाठी आहे की लाडक्या कंत्राटदारांसाठी? असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात आला आहे.

शिवसेनेने त्यांच्या एक्स अकाऊंटवरून याबाबतची बातमी शेअर करत मिंधे भाजप सरकारला फटकारले आहे. ”गौरी गणपतीत जनतेला आनंदाचा शिधा देण्याच्या निमित्ताने मिंधे सरकारने पुन्हा एकदा आपल्या लाडक्या मित्र कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट घातला आहे. मिंधे सरकारच्या ह्या मनमानी कारभाराला लगाम बसणार तरी कधी? असा सवाल या पोस्टमधून करण्यात आला आहे.