शिवसेनेचा छत्रपती संभाजीनगरात आज शिवसंकल्प मेळावा; उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार

स्थळः सूर्या लॉन्स

वेळः सकाळी 11 वाजता

‘शेतकऱ्यांना न्याय देणार, गद्दारांना गाडणार’, अशा संकल्पनेतून शिवसेनेचा भव्य शिवसंकल्प मेळावा उद्या 7 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरात होणार आहे. शहरातील बीड बायपास रोडवरील सूर्या लॉन्स येथे सकाळी 11 वाजता हा मेळावा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील शिवसैनिकांसाठी शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी शिवसेनेने जय्यद तयारी केली असून तीन हजार बूथप्रमुख, बाराशे शाखाप्रमुख तसेच सरपंच, नगरसेवक, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह शिवसेना पदाधिकार्यांची या मेळाव्याला उपस्थिती असेल, अशी माहिती शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. मेळावा तीन सत्रांत होणार असून समारोपाच्या सत्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

पहिले सत्र ‘चला जिंकूया’ या विषयावर वैभव वाघ यांचे भाषण.

दुसरे सत्र – ‘बळीराजाचा वाली कोण?’ या विषयावर शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, आमदार उदयसिंग राजपूत, कृषिभूषण भाऊसाहेब थोरात यांचे भाषण.

तिसरे सत्र ‘संघर्ष करीन, लढत राहीन… मी रणरागिणी’ या विषयावर शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे यांचे भाषण. ‘हाती घेऊ मशाल रे… पाप जाळू खुशाल रे’ या विषयावर शिवसेना नेते अंबादास दानवे यांचे, तर ‘राजकीय आव्हाने’ या विषयावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे भाषण होणार आहे.