शिवसेनेचा 7 जुलैला छत्रपती संभाजीनगरात शिवसंकल्प मेळावा, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार

 ‘शेतकऱ्यांना न्याय देणार आणि गद्दारांना गाडणार’ या घोषवाक्याखाली 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शहरातील बीड बायपास रोडवरील सूर्या लॉन्स येथे शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा होणार आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या मेळाव्यास छत्रपती संभाजीनगर जिह्यातील शिवसैनिकांना तांत्रिक, सामाजिक व राजकीय मार्गदर्शन केले जाणार आहे. पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार, प्रसार व कार्यक्रम कशा पद्धतीने घेण्यात यावेत यासाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा हा यामागचा उद्देश असल्याचे दानवे यांनी म्हंटले.

उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जानेवारी महिन्यापासून प्रचार करण्यास सुरुवात केली होती. प्रचारादरम्यान एकूण 105 सभा या दरम्यान त्यांनी घेतल्या होत्या. त्याचे परिणाम आपल्या सर्वांसमोर असून त्याच धरतीवर विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीची सुरुवात छत्रपती संभाजीनगर येथून करण्यात येणार असल्याचे अंबादास दानवे यांनी जाहीर केले.

पाच हजार शिवसैनिक सहभागी होणार

जिह्यातील पाच हजार शिवसैनिक या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. मागील दोन ते अडीच वर्षांत घडलेल्या घटनांना विसरून पुन्हा एकदा नव्या जोमाने पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, यासाठी ही संकल्पना राबवण्यात येत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिह्यात शिवसेनेने सहा विधानसभेच्या जागा जिंकल्या होत्या, परंतु दोन वर्षांपूर्की यातील पाच जणांनी गद्दारी केली आहे. त्याचा वचपा काढण्यासाठी जिह्यात पुन्हा सहा जागा जिंकून आणण्यासाठी या मेळाव्यादरम्यान संकल्प केला जाणार असल्याची ग्वाही यावेळी दानवे यांनी दिली.

मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक

या मेळाव्याच्या नियोजनासाठी शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी व युवासेना पदाधिकारी यांच्यासमवेत अंबादास दानवे यांनी क्रांतीचौक येथील मातृभूमी प्रतिष्ठान कार्यालयात आज बैठक घेतली. शिवसेना सदस्य नोंदणी, नवीन मतदार नोंदणी, जुन्या मतदारांच्या नावातील दुरुस्ती व मतदान ओळखपत्र काढून देण्यासाठी कॉर्डनिहाय शिबीर आयोजित करण्यात यावे, अशी सूचना यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना अंबादास दानवे यांनी केली.