बांगलादेशी हिंदूंवर सातत्याने होणाऱया अन्याय, अत्याचार व दडपशाही विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज सोमवारी क्रांतीचौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात ‘करू नका हिंदूद्वेष, शांत ठेवा बांगलादेश, बांगलादेशी हिंदूओं पर हमले बंद करो, बांगलादेशी हिंदू के सम्मान में, शिवसेना मैदान में…’ अशा गगनभेदी घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते.
केंद्र सरकार बांगलादेशी हिंदूंवर होणारा अन्याय, अत्याचार गप्प बसून बघत आहे. एकीकडे बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना आश्रय दिला जात असताना तेथील हिंदू निराधार झाला आहे. सध्या बांगलादेशात हिंदूंवर मोठय़ा प्रमाणात अत्याचार होत असताना केंद्र सरकार गप्प बसून आहे. हिंदुस्थानात घुसलेल्या बांगलावासियांना तत्काळ देशाबाहेर काढा आणि बांगलादेशातून येणाऱया वस्तूंवर बहिष्कार टाका, त्यांच्या खेळाडूंना आपल्या देशात खेळू देऊ नका, अशी मागणी यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत असताना पेंद्र सरकार मूग गिळून गप्प का, असा सवालही दानवे यांनी यावेळी केला.
महानगरप्रमुख राजू वैद्य, माजी महापौर नंदकुमार घोडेले, सुभाष पाटील, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, गिरजाराम हाळनोर, विजय वाघमारे, चंद्रकांत गवई, हिरा सलामपुरे, लक्ष्मीनारायण बाखरिया, किशोर कच्छवाह, शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, पश्चिम विधानसभा प्रमुख राजू शिंदे उपस्थित होते.