
दादरहून कोकणात जाणाऱया रत्नागिरी व सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन अचानक बंद करणाऱया मध्य रेल्वेने शिवसेनेच्या दणक्यानंतर दोन्ही पॅसेंजर लवकरच सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे शिवसेनेने शनिवारचे ‘रेल रोको’ आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
कोकणी जनतेची गैरसोय करणाऱ्या मध्य रेल्वेला आठवडाभरापूर्वी शिवसेनेने उग्र आंदोलनाचा इशारा दिला होता. दादर-रत्नागिरी आणि दादर- सावंतवाडी पॅसेंजर होळीआधी सुरू करा, नाहीतर 1 मार्चला दादर स्थानकात तीव्र ‘रेल रोको’ करू, दादरहून गोरखपूर व बरेलीला जाणाऱया ट्रेन सुटूच देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला होता. शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, आमदार सुनील शिंदे, महेश सावंत, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस बाबी देव, संजय जोशी, विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी 20 फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना स्मरणपत्र दिले होते. त्याचवेळी दोन्ही पॅसेंजर दादरवरून कशा सोडता येईल, या ट्रेनचा इतर गाडय़ांवर कोणताही परिणाम होणार नाही, याबाबत रेल्वे कामगार सेनेचे संजय जोशी, बाबी देव यांनी अभ्यासपूर्ण म्हणणे मांडले होते.
होळीआधी ट्रेन सुरू झाली नाही तर ‘रेल रोको’
दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी या दोन्ही पॅसेंजर पूर्वीच्या वेळापत्रकानुसार दादर स्थानकातून तातडीने सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाकडून होळीआधी योग्य ती कार्यवाही न झाल्यास दादरवरून गोरखपूर आणि बरेलीला जाणाऱया ट्रेनसमोर कोणत्याही क्षणी ‘रेल रोको’ आंदोलन केले जाईल. दादर-गोरखपूर आणि दादर-बरेली या गाडय़ा दादरवरून सुटू देणार नाही, असा इशारा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिला आहे.