महाराष्ट्र पायपुसणे नाही, राज्यातून तुमचे नामोनिशाण मिटवून टाकू; उद्धव ठाकरे कडाडले

रत्नागिरी राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी मिंध्यांना आणि भाजपला चांगलेच झोडून काढले. भाजपला आता दाढीवाला खोडकिडा लागला आहे. तो भाजप पोखरत आहे. भाजपला आता निष्ठावंतांची आणि संघाचीही गरज नाही. त्यामुळे हा भाजप आणि त्यांचे ढोंगी हिंदुत्व आपल्याला मान्य नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. कोकणी जनता येथील घराणेशाहीच्या गुंडगिरीला चूड लावण्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच आता कोकणात मशाल धगधगत ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्र हा पायपुसणे नाही, राज्यातून तुमचे नामोनिशाण मिटवून टाकू, असेही त्यांनी ठणकावले.

लोसभेच्यावेळी देश वाचवायचा होता. आता आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा आहे. आपला महाराष्ट्र लेच्यापेच्यांचा नाही. महाराष्ट्र पैसे फेकून विकत घेता येत नाही. कितीही पैसेवाला असू दे, महाराष्ट्राच्या मातीत स्वाभिमान, जिद्द आणि लढाऊबाणा आहे, तो कितीही पैसे फेकले तरी विकला जाऊ शकत नाही. भास्कर जाधव यांनी चांगलीच तलवारबाजी केली. आता तुम्ही म्हणाले तशा सभा घ्या आणि गद्दारांचा सुपडा साफ करून टाका, असेही ते म्हणाले.

आपल्यावर जे घराणेशाहीचे आरोप करतात त्यांना आपला सवाल आहे की, इथे दोन भाऊ खात आहेत, तिथे दोन भाऊ आणि वडील कोकण खात आहेत. कोकणात दुसऱ्या कोणी जगायचेच नाही काय, असा सवालही त्यांनी केला. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप केला. तो आम्ही मान्य करतो. आम्ही एक परंपरा घेऊन पुढे जात आहे. त्यामुळे आज माझ्याकडे स्वतःचे काहीच नसताना एवढी जनता आपल्यामागे आहे. आशिर्वाद देणारी हक्काची माणसे सोबत आहेत. आता मशाल धगधगत आहे. निवडणुकीच्या क्षणाची आपण वाट बघत होतो. तो क्षण आता आला आहे. आपल्याला कोकणात मशाल धगधगत ठेवायची आहे. हे खोकेबाजीचे राजकारण आता जाळून भस्म करावे लागेल, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

हा उद्धव ठाकरे, शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही. आपल्या कोकणाच्या आणि महाराष्ट्रच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. कोकण कोणाचे, गुंडांचे की कोकणवासीयांचे, हे आता तुम्ही ठरवायचे आहे. तुमचे भविष्य, भवितव्य शिवशाही मानणाऱ्या शिवसैनिकाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याच्या हातात द्यायचे आहे की, गुंडांच्या हातात द्यायचे आहे. पैशांचा माज दाखवत कोणालाही विकत घेऊ शकतो, अशा गुर्मीत असणाऱ्यांना तुमचे भविष्य आणि भवितव्य देणार आहात का, तुमच्यात आणि घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये मी उद्धव बाळासाहे ठाकरे उभा आहे, असे त्यांनी ठणकावले.

महाराष्ट्रासाठी, देशासाठी, हिंदुत्वासाठी आपण भाजपसोबत आलो होतो. पण भाजपला अवदसा आठवली. त्यांचे ध्येय साध्य झाल्यावर संकंटकाळात सोबत केलेल्या शिवसेनेला त्यांनी बाजूला सारले. हा गद्दार आपणच तुम्हाला दिला होता. आपल्यावर विश्वास ठेवत जनतेने त्याला निवडून दिले होते. भाजपने अचानक युती तोडल्यानंतर या भूताला आपण उभे केले होते. आता हे भूत मानेवरून उतरवून टाका. आम्ही आमच्या शब्दाखातर त्यांना मंत्री केले. या अडीच वर्षाच्या काळात या उद्योगमंत्र्यांनी बाहेरचे किती उद्योग केले. त्यांनी जिल्ह्यात किती उद्योग आणले, असा सवाल त्यांनी केला. मात्र, त्यांना निष्ठावंतांशी लढायचे आहे. आमचे निष्ठावंत खोके घेत सूरतला पळाले नाही, राजन साळवी यांना, त्यांना कुटुंबियांना छळण्यात आले. धाड टाकण्यात आली. त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत विचारण्यात आली, महाराज नसते तर हे आज दिसले नसते. महाराजांची किंमत करणारे हे कोण, असा जळजळीत सवालही त्यांनी केला.

सिंधुदुर्गात पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते झालेला पुतळा कोसळला. नंतर मोदी यांनी माफी मागितली. तीही गुर्मीत मागितली. हा महाराष्ट्र पायपुसणे नाही. आम्ही राज्यातून तुमचे नामोनिशाण पुसून टाकेल. तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान केला होता, त्यांना हटवले नाही. मात्र, मोदीवर टीका झाली तर लगेच कारवाई करतात. महाविकास आघाडीचे सरकार आले तर राज्यात प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करणार. महाराष्ट्रातच नाही तर सूरतमध्येही महाराजांचे मदिर बांधणार. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

मी घरी बसून सर्वांची घर सांभाळली म्हणून जनता मला कुटुंबप्रमुख मानते. त्यांची घरफोड्यांची औलाद आहे. घरं फोडून ते राज्य करत आहेत. कोरोनाचा बंदोबस्त करण्यात राज्य प्रथम क्रमांकावर होते. त्यावेळी ते कोठे होते. राज्यात एकाही मृतदेहाची विटंबना होऊ दिली नाही. मृत्यूदर कसा कमी होईल, याची काळजी आपण घेतली होती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढवणार आहोत. राज्यातील प्रत्येक गरीबाला 10 रुपयात पोटभर जेवण मिळालेच पाहिजे, असेही ते म्हणाले.

लाडकी बहीण योजनेतून बहीणीची फसवणूक होत आहे. मुलगी शिकली प्रगती झाली. 1500 रुपये देत घरी बसवली. असे होत अशले तर योजनेचा काय फायदा. आपले सरकार आल्यावर राज्यात मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिकण देण्यात येणार आहे. शिक्षण घेत स्वतःच्या पायावर उभे राहा. शेतकऱ्यांचे नुकसान न होता पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्यात येतील, असे आश्वासन आम्ही देत आहोत. आम्हाल फुकटात काहीही नको, आम्हाला हक्काचे हवे आहे, असे ते म्हणाले.

बदलापूर घटनेमध्ये पिडीत मुलीच्या आईला अनेक तास ताटकळत ठेवले. आमचे सरकार आल्यावर महिलांना संरक्षण आणि सन्मान देण्यात येईल. राज्यात नवीन रोजागार आलेला नाही. आपले सरकार गद्दारांनी पाडले नसते तर अनेक रोजगार महाराष्ट्रात सुरू झाले होते. टाटा एअरबस गुजरातला नेणार आणि कोकणात बारसु रिफानरी देणार. आमचे सरकार आल्यावर ही रिफायनरी हटवणार म्हणजे हटवणारच. जनतेला न विचारता त्यांच्या उद्योगपती मित्रांना काय हवे, त्याचा विचार करण्यात येतोय, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

मुंबईतील धारावी, राधानगरीतील पाणी,. चंद्रपुरातील शाळा अदानीला विकण्यात आली आहे. राज्यातील हे सर्व ते अदानीला विकत आहे. उद्या मंत्रालयही गुजरातला नेल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यांना शिवसेनेशिवाय कोणीही जाब विचारत नव्हते. आपण जाब विचारत असल्याने त्यांनी शिवसेना फोडली, असा आरोपही त्यांनी केला. भाजपचे हिंदुत्व आपल्याला मान्य नाही. भाजपला आता निष्ठावंतांची गरज नाही. भआजप नड्डा म्हणतात की आता आम्हाला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची गरज नाही. हा भाजप जनतेला मान्य आहे काय, असा सवालही त्यांनी केला. भाजपला दाढीवाल खोडकिडा लागला आहे. ते सर्व भाजप पोखरत आहे. आता अटलजी, लालकृष्ण आडवाणी याची भाजप राहिलेला नाही.

महाराष्ट्राला दिशा देण्याचा निर्णय आता जनतेला घ्यायचा आहे. आता सर्वोच्च न्यायालयात 8 तारखेला सुनावणी होत आहे. आम्ही देशातील जनतेसाठी न्याय मागत आहोत. पक्ष फओडून आमदार विकस घेत सत्ता स्थापन होऊ लागली आणि अडीच वर्षे न्याय मिळत नसेल तर जनतेचा न्यायव्यवस्थेवरील जनतेला विशअवास उडेल. शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिले आहे. ते नाव ते कोणी कोणालाही देऊ शकत नाही. चिन्ह ते देऊ शकतात. तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. मात्र, शिवसेना हे नाव माझे आहे आणि मी तेच लावणार. न्यायालयानेही आता सुनावणी न घेता आता निकाल द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. आता जनतेनेच याबाबत न्याय द्यायचा आहे. कोकणातली घराणेशाही म्हणजेच गुंडशाहीला कोकणी जनता चूड लावल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.