शिवसेनेचे मुंबईत आज निर्धार शिबीर, उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन

विधानसभा निवडणुकीनंतरची वाटचाल आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे दणदणीत आणि खणखणीत असे निर्धार शिबीर उद्या मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार असून उद्धव ठाकरे तमाम शिवसैनिकांना कोणता विचार आणि संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना ईशान्य मुंबई विभागाच्या वतीने आमदार सुनील राऊत यांच्या पुढाकाराने या निर्धार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दोन सत्रांत हे शिबीर होणार असून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिबिराचे सकाळी 10.30 वाजता उद्घाटन होणार आहे. पहिले सत्र सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तर दुसरे सत्र दुपारी 2 ते 8 वाजेपर्यंत चालणार आहे. दुसऱ्या सत्राची सांगता उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे.

संघटनेच्या पुनर्बांधणीवर मंथन

दुसऱया सत्रात ‘मी शिवसेनेत का आलो’ हे उपनेते साजन पाचपुते, किरण काळे, वसंत मोरे सांगणार आहेत. तर ‘संघटनेचा आत्मा आणि पुनर्बांधणी’ यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मार्गदर्शन करणार आहेत. अॅड. असीम सरोदे हे या शिबारात ‘फेक नरेटिव्ह महाराष्ट्रापुढील समस्या’

याबाबत शिवसैनिकांना जागरूक करणार आहेत. तर ‘आम्ही मुंबई-कोकणात असे लढलो’ याचे विवेचन शिवसेना नेते भास्कर जाधव करणार आहेत.

‘एक धगधगता विचार’ झळकणार

‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेला शिवसैनिक’ या विषयावर शिवसेना नेते – खासदार संजय राऊत या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधी ‘एक धगधगता विचार’ ही शिवसेनेच्या दिमाखदार वाटचालीवर प्रकाश टाकणारी अर्ध्या तासाची खास चित्रफीत मोठ्या एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे. या शिबिरात सायंकाळी 4.45 ते 5.45 या दरम्यान परेश दाभोळकर प्रस्तुत ‘बोल मराठी – ताल मराठी’ हा मराठी वाद्यवृंदाचा कार्यक्रम होणार आहे.

मुंबईच्या समस्यांवर आदित्य ठाकरे बोलणार

शाहीर नंदेश उमप यांच्या पहाडी आवाजात पोवाडा तसेच अंबामातेच्या जागराने शिबिराचा शुभारंभ होणार आहे. दीपप्रज्वलन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होईल तर स्वागत सुनील राऊत करतील. पहिल्या सत्रात ‘मुंबई आणि मुंबईच्या समस्या’ यावर आदित्य ठाकरे बोलणार आहेत तर ‘आम्ही शिवसेनेत का’ यावरील प्रश्नांना शिवसेना नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई, अनंत गीते, राजन विचारे उत्तरे देणार आहेत. ‘शिवसेना सदस्य नोंदणी आणि नवीन मतदार नोंदणी’ याबाबत शिबिरात शिवसेना नेते – खासदार अनिल देसाई मार्गदर्शन करतील.

स्थळ – कालिदास नाट्यगृह, मुलुंड
वेळ – सकाळी 9 ते रात्री 8