मणिपुरात राष्ट्रपती राजवट; प्रस्तावाला शिवसेना, राष्ट्रवादीचा पाठिंबा

गेल्या 22 महिन्यांपासून वांशिक संघर्षामुळे धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावर आज लोकसभेत एकमत झाले. गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेल्या प्रस्तावाला सर्वपक्षीय मंजुरी मिळाली. मात्र मणिपूरमधील परिस्थिती सरकार योग्य प्रकारे हाताळू शकले नाही, अशी तोफ विरोधकांनी मोदी सरकारवर डागली.

गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये कुठल्याही प्रकारची हिंसाचाराची घटना घडलेली नाही, असा दावाही अमित शहा यांनी केला. तसेच राज्यात शांतता नांदावी यासाठी कुकी आणि मैतेई या दोन समुदायांमध्ये चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले. मदत शिबिरांमध्ये नागरिक शांततेत राहत आहेत. येथील परिस्थिती समाधानकारक आहे असे मी म्हणत नाही, परंतु शांतता नांदावी यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे गृहमंत्री म्हणाले.

80 टक्के लोकांचा पहिल्याच महिन्यात मृत्यू

राज्यातील उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मणिपूरमध्ये वांशिक हिंसाचार उफाळून आला. त्यानंतर आम्ही लगेच पेंद्रीय सुरक्षा दलांना पाचारण केले. यात आम्ही दिरंगाई केली नाही, असा दावा अमित शहा यांनी केला. मे 2023 पासून सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षात 260 लोकांनी जीव गमवाला. यातील 80 टक्के लोकांचा संघर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात मृत्यू झाला, अशी माहिती अमित शहा यांनी दिली.

राष्ट्रपती राजवट सशक्त लोकशाहीसाठी चांगली नाही – सुप्रिया सुळे

संपूर्ण देश ‘एक देश, एक निवडणुकी’वर चर्चा करत आहे, परंतु राष्ट्रपती राजवट लावावी लागते हे सशक्त लोकशाहीसाठी चांगले नाही. गृहमंत्र्यांनी येथील जनजीवन पूर्ववत होण्यासाठी प्राधान्याने हस्तक्षेप करण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर डीएमकेच्या नेत्या के. कनिमोळी यांनी मणिपूरमध्ये सुरू असलेले फुटीचे राजकारण आधी बंद झाले पाहिजे. मणिपूरमध्ये पुन्हा शांतता नांदावी आणि येथील जनजीवन पूर्ववत व्हावे. तसेच लोकांनी निवडून दिलेले सरकार यावे अशी आमची इच्छा असल्याचे सांगितले.

राष्ट्रपती राजवटीचे स्वागत – अरविंद सावंत

मणिपूरमधील सद्यस्थितीबद्दल काळजी वाटते, असे शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले. मी याबाबत बोलण्यासाठी उभा राहतो तेव्हा खूप व्यथित होतो. आम्ही मणिपूरला गेलो, तेव्हा गोगोई आमच्यासोबत होते. तेव्हा महिला राज्यपालांनी हतबलता प्रकट केली होती. आम्ही राष्ट्रपती राजवटीचे समर्थन करतो, असे ते म्हणाले.