सीएसएमटीसमोर शिवरायांचा पुतळा लवकरात लवकर उभारा, शिवसेनेची लोकसभेत जोरदार मागणी

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या वास्तूसमोर (सीएसएमटी) महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर उभारा, अशी जोरदार मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सोमवारी लोकसभेत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात; मात्र शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांच्याच सरकारकडे वेळोवेळी मागणी करावी लागतेय हे दुर्दैवी आहे, अशी खंत सावंत यांनी बोलून दाखवली. मुंबईची लोकल सेवा तसेच कोकण रेल्वेच्या प्रश्नांकडे मोदी सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

लोकसभेत बोलताना खासदार अरविंद सावंत यांनी महाराष्ट्रातील रेल्वेच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. मुंबईतील लोकल ट्रेनची स्थिती सुधारली पाहिजे, विकासकामे करताना प्रकल्पांचे फायदे-तोटे, प्राधान्याच्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत, असा मुद्दा त्यांनी मांडला. माजी पेंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी एलिव्हेटेड ट्रेनचा प्रकल्प विचारात घेतला होता. त्याचे पुढे काय झाले? एलिव्हेटेड ट्रेन हार्बरवरून वाशीमार्गे पुढे नेल्यास लोकांची सोय होईल. रेल्वेचे उत्पन्न वाढेल. मात्र मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन नेमके काय करतेय हेच कळत नाही. पोर्ट ऑथॉरिटीचे रेल्वे ट्रक वापराविना पडून आहेत. ते ट्रक दिवसा प्रवाशांसाठी व रात्री मालवाहतुकीसाठी वापरावेत. विकासकामे करताना सौंदर्यीकरणावर जास्त खर्च केला जात आहे. कोकण रेल्वेवर कणकवली स्थानक बाहेरून खूप चांगले बनवले आहे; परंतु प्लॅटफॉर्मवर छत नाही, टॉयलेटची सुविधा नाही. सरकारने प्रवाशांना मूलभूत सुविधा देण्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.

लोकलच्या महिला डब्यात टॉयलेटची व्यवस्था हवी!

मुंबई लोकलचा डहाणूपर्यंत विस्तार झाला आहे. तास-दीड तासाच्या प्रवासात महिलांच्या सोयीकडे लक्ष द्या. लोकलमध्ये महिलांसाठी टॉयलेट असलेल्या विशेष कोचची व्यवस्था करा, असाही मुद्दा खासदार सावंत यांनी मांडला.

मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला नाना शंकरशेट यांचे नाव द्या!

मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांनी आपली जमीन देऊन ट्रेन सुरू केली. त्यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून मुंबई सेंट्रल स्टेशनला नाना शंकरशेट यांचे नाव दिलेच पाहिजे, अशी आग्रही भूमिका खासदार सावंत यांनी यावेळी मांडली.

दादर-सावंतवाडी ट्रेन सुरू करण्याबाबत टोलवाटोलवी का?

कोविड काळात बंद केलेली दादर-सावंतवाडी ट्रेन पुन्हा सुरू करण्यास टाळाटाळ सुरू आहे. जर गोरखपूर सोडू शकता, तर दादर-सावंतवाडी ट्रेन का सुरू करीत नाही? कोकण व मध्य रेल्वेने एकत्र बसून हा प्रश्न सोडवला पाहिजे, असे खासदार सावंत म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनस येथे कायमस्वरूपी छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरी पुतळा बसवण्यात यावा, अशी जोरदार मागणी करत शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते – खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजकुमार बाफना, अरुण दुधवडकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, विभागसंघटक युगधंरा साळेकर उपस्थित होते.