
महायुती सरकारचा आणखी एक चुनावी जुमला समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांना झिरो बिल आलं होतं. निवडणुनंतर शेतकऱ्यांना थकीत बिल महायुती सरकारने पाठवलं आहे. शेतकऱ्यांना लाखो रुपयांचं थकीत बिल आलं आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांचं वीजबिल घेऊन विधानसभेत हा मुद्दा मांडला. झिरो बिल हे फक्त निवडणूकपूर्तीच होतं का? असा सवालही कैलास पाटील यांनी महायुती सरकारला विचारला आहे.
याच मुद्द्यावर बोलताना कैलास पाटील म्हणाले आहेत की, महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. निवडणूक काळात मते मिळवण्यासाठी खोटी आश्वासने दिली. X वर एक पोस्ट करत कैलास पाटील म्हणाले आहेत की, “निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना शून्य रुपये वीजबिल देऊन त्यावर केवळ आपल्या प्रसिद्धीसाठी महायुती सरकारच्या प्रमुख नेत्यांनी फोटो झळकावले. मात्र निवडणुकीनंतर त्याच शेतकऱ्यांना 1.12 लाख रुपयांचे वीजबील दिले जाते. ही एक प्रकारची शेतकऱ्यांची फसवणूकच आहे.
ते म्हणाले आहेत की, “अगोदरच शेत मालाला भाव नाहीत, त्यातही निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांचे चालू बिल माफ केलंय की, थकबाकीसह याची स्पष्टता सरकारने दिली पाहिजे”, अशी मागणी त्यांनी केली आहे.