
केईएम रुग्णालय शतकपूर्ती सोहळा साजरा करीत असताना गेटबाहेर इंग्रजीमध्ये स्वागताचा बोर्ड लावला आहे. एकीकडे मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला असताना केईएम प्रशासनाकडून मराठीला डावलल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करा, अशी मागणी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी प्रशासनाकडे केली आहे.
शतकमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱया केईएम रुग्णालयाकडून 18 ते 22 जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी गेटवरील बोर्ड इंग्रजीत लिहिण्याचा अट्टहास प्रशासनाकडून धरण्यात आला. कार्यक्रम संपून दोन महिने झाले तरी प्रशासनाने या ठिकाणचा इंग्रजी बोर्ड काढलेला नाही. त्यामुळे आमदार अजय चौधरी यांच्या आदेशानुसार माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी आंदोलनही करण्यात आले.
मराठी बोर्ड लावणे बंधनकारक
मराठीला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून महाराष्ट्रात प्रशासनाचा कारभार मराठीत करणे अनिवार्य आहे. असे असताना केईएम प्रशासनाने इंग्रजीत बोर्ड लावल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने तातडीने यावर कारवाई करावी, यासाठी अनिल कोकीळ यांनीदेखील केईएमच्या अधिष्ठात डॉ. संगीता रावत यांना निवेदन दिले आहे.