
कोकणची भूमी ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमी आहे. आम्ही तिचे रखवालदार आहोत. बाळासाहेबांची आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात पुन्हा एकदा राजापूरसह कोकण जिंकून सुपूर्द करू. कोकणात गद्दारीला जराही थारा देणार नाही, असा निर्धार राजापूर विधानसभा क्षेत्रातील मुंबईतील चाकरमानी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
शिवसेना नेते सचिव विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर विधानसभेतील मुंबई चाकरमानी पदाधिकाऱ्यांची सभा शिवसेना भवन येथे आज संध्याकाळी झाली. यावेळी राजापूर विधानसभेतील शेकडो पदाधिकाऱयांनी हॉल खचाखच भरला होता. कोकणचा गड हा शिवसेनेचा होता आणि शिवसेनेचाच राहणार, अशी गर्जना करत कोकणातून शिंदे गटात गद्दारी करून जाणाऱया माजी आमदार राजन साळवी यांचा सभेत धिक्कार करण्यात आला. यावेळी दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, माजी जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग उपळकर, विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश कदम, राजापूर विधानसभा संपर्कप्रमुख चंद्रकात नकाशे, तालुका संपर्कप्रमुख अनिल भुवड, जगदीश जुलूम, शांताराम चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.