संविधानावरून सध्या संसदेच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप व नरेंद्र मोदींवर जोरदार घणाघात केला. ”मोदी हे देशाला लाभलेले असत्य बोलणारे महान प्रधानमंत्री आहेत”, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
”या देशातील न्यायालय, निवडणूक आयोग यांना संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार मोदींच्या राज्यात उद्ध्वस्त झाले आहेत. न्यायव्यवस्था दबावाखाली आहे. निवडणूक आयोग ज्याने या देशात निष्प:क्षपणे निवडणूका घ्यायच्या असतात तो निवडणूक आयोग हा राज्यकर्त्यांच्या दबावाखाली काम करतोय. पण संविधानाला धरून काम करत नाही. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांनी संविधानावर बोलणं हा संविधानाचा अपमान ठरेल. भाजपने सांगावं की त्यांनी संविधान मजबूतीसाठी काय केलं. विरोधी पक्ष राहू नये म्हणून ते प्रयत्न करत आहेत. विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकायचं. विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणं हे कोणत्या संविधानाच्या कलमात लिहलं आहे. भाजपची सगळी लोकं दुधाने धुतलेली आहेत का? ईडी ज्यांच्याकडे गेली होती त्यांना आता नरेंद्र मोदी मांडीवर बसवून आईच्या ममतेने दूध पाजतायत. 70 हजार कोटींचा आरोप तुम्ही ज्यांच्यावर केला ते तुमच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात. आमच्यातून फुटलेले आमदार दहाव्या शेड्यूलनुसार अपात्र ठरायला हवे होते. पण मोदींच्या दबावाखाली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश चंद्रचूड यांनी तो निर्णय दिला नाही. हे काय संविधानात बसतंय का? चंद्रचूड यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे. ज्या पद्धतीने मोदी राज्य चालवतायत ते संविधानविरोधात आहे. संविधान हा देशाचा आधार आहे, तो आधारच मोदींनी उद्ध्वस्त केलाय”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.