”शिवसेना फोडणं हे महाराष्ट्र व मराठी माणसाविरोधातलं कारस्थान आहे. मोगलांनी महाराष्ट्रावर केलेल्या आक्रमणानंतरच हे मोदी शहांनी महाराष्ट्रावर केलेलं सर्वात मोठं आक्रमण आहे”, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मिंधे गटाची सालटी काढली.
गुरुवारी शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन आहे. मिंधे गटाकडून ही वर्धापन दिन साजरा केला जाणार असल्याबाबत पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणारे शिवसेनाचा वर्धापन दिन साजरा करू शकत नाही’, असे ठणकावून सांगितले आहे. ”उद्या शिवसेनेचा 58 वा वर्धपन दिन आहे. हिंदुहृदयस्रमाट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, मराठी माणसासाठी शिवसेनेची स्थापना केली. आता उद्धव ठाकरे त्या शिवसेनेचे नेतृत्व करत आहे. मिंधे यांचा शिवसेनेशी काय संबंध? हिंदुहृदयस्रमाटांच्या विचारधारेशी बेईमानी करत महाराष्ट्राचे दुश्मनांशी हातमिळवणी करणारे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करू शकत नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना. आमचा उद्या मोठा कार्यक्रम आहे. संपूर्ण देशातून लोकं येणार आहे. येत्या निवडणूकीत काय रणनीती असणार त्याविषयी उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.
”बाळासाहेबांच्या विचारधारेची शिवेसना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जोमाने पुढे जातेय. आमची शिवसेना खरी म्हणणाऱ्यांनी आरशात पहावं, शिवसेना स्थापन झाली तेव्हा ते कुठे होते. कुठल्या गोधडीत रांगत होते. डोम नावाच्या सभागृहात हे सर्व डोमकावळे जमणार आहेत. पैशाने मतं विकत करणं, वायकरांसारख्या विजयाच्या चोऱ्या करणं याला जनाधार म्हणत नाही. आपला गट महाराष्ट्राशी दुश्मनी करणाऱ्या मोदी शहांच्या चरणावर ठेवणं याला जनाधार म्हणत नाही. लांडग्यांनी वाघाचं कातडं पांघरलं तर तो वाघ होत नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना. हे मधे शिंदे मिंधे जे आलेयत त्यांना भाजपने आणलंय. हे महाराष्ट्राविरोधातलं कारस्थान आहे. शिवसेना फोडणं हे मोगलांनंतरचं महाराष्ट्रावरचं सगळ्यात मोठं आक्रमण मोदी शहांनी केलं आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.