मुंबईतील हॉटेल्स मालकांनी मेन्यू कार्ड मराठीत करावेत; शिवसेनेची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना दिलं पत्र

मुंबईमधील हॉटेल्स, उपहारगृहांमधील मेन्यू कार्ड मराठीत करावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपविभाग प्रमुख कृष्णा पवळे यांनी केली. आपल्या मागणीच पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे.

कृष्णा पवळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “महाराष्ट्र सोडून इतर राज्यात गेल्यानंतर तेथील स्थानिक व्यवसायिक, दुकानदार, हॉटेल व उपहारगृहमालक आपली देयके तसेच आपल्या भोजनसुची (मेन्यू कार्ड) देताना तेथील स्थानिक भाषेला प्राधान्य देतात. या ठिकाणची विक्री देयके, भोजनसुची (मेन्यू कार्ड) व इतर बाबीमध्ये त्यांच्या स्थानिक भाषेचा समावेश असतो. आपल्या राज्यात मात्र याउलट परिस्थिती आहे. मुंबई आणी महाराष्ट्रात आपला व्यवसाय करत असतानाही येथील व्यवसायिक, दुकानदार व हॉटेल मालक आपली देयके अदा करताना तसेच भोजनसुची (मेन्यू कार्ड) मध्ये इंग्रजी भाषेचा वापर करतात.”

पवळे यांनी पत्रात पुढे लिहिलं आहे की, “आम्हाला कोणत्याही भाषेला विरोध नाही. परंतु मुंबई, महाराष्ट्रात असताना आणि मराठी येथील मातृभाषा असल्याने आपल्या भाषेचा आणि राज्याचा सन्मान राखावा यासाठी आपल्या अखत्यारीतील सर्व दुकानमालक, व्यवसायिक, हॉटेल व उपहारगृह मालक यांना आपल्या विकी देयके, भोजनसुची (मेन्यू कार्ड) व इतर बाबींमध्ये मराठीचा समावेश करण्याच्या आपणा सुचना कराव्यात. हा केवळ एक नियम नाही तर मराठी भाषा व मराठी समाजाचा सन्मान करण्याचा एक प्रयत्न आहे.”