
दादरहून कोकणात जाणाऱया सावंतवाडी व रत्नागिरी पॅसेंजर अचानक बंद करून कोकणी जनतेची गैरसोय करणाऱया मध्य रेल्वेला गुरुवारी शिवसेनेने उग्र आंदोलनाचा इशारा दिला. सावंतवाडी आणि रत्नागिरी पॅसेंजर वेळीच सुरू करा, नाहीतर 1 मार्चला दादर स्थानकात तीव्र ‘रेल रोको’ करू, दादरहून गोरखपूर व बरेलीला जाणाऱया ट्रेन सुटूच देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा देत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना तसे स्मरणपत्र दिले. कोकणच्या गाडय़ा उत्तर प्रदेशकडे वळवून कोकणी जनतेला दिलेली सापत्न वागणूक खपवून घेणार नसल्याचे शिवसेनेने मध्य रेल्वेला ठणकावले.
दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी या पॅसेंजर ट्रेन सुरू करण्यासाठी रेल कामगार सेनेने मध्य रेल्वेला दोनदा पत्र दिले होते आणि कार्यवाहीला गती देण्याची मागणी केली होती. त्याकडे रेल्वे प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्ष केले. दोन्ही पॅसेंजर लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन देऊन 40 दिवस उलटले तरी प्रशासन ढिम्म राहिले. कोकणी जनतेवर केल्या जाणाऱया या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गुरुवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. शिष्टमंडळात शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, आमदार सुनील शिंदे, महेश सावंत, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस बाबी देव, संजय जोशी, विभागप्रमुख संतोष शिंदे, रेल प्रवासी संघटनेच्या अॅड. योगिता सावंत, नरेश बुरघाटे, चंद्रकांत विनरकर आदी पदाधिकारी होते. दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी पॅसेंजर पूर्वीच्या वेळेनुसार दादर स्थानकातून तातडीने सुरू कराव्यात, यासंदर्भात रेल्वेकडून वेळीच योग्य ती कार्यवाही न झाल्यास 1 मार्चला दादर स्थानकात ‘रेल रोको’ केला जाईल, दादर-गोरखपूर व दादर-बरेली या ट्रेन सोडू देणार नाही. यामुळे होणाऱया नुकसानीची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहील, असे शिवसेना शिष्टमंडळाने मध्य रेल्वेला बजावले.
रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचे भाजपचे ढोंग
रेल्वेच्या जमिनीवर अनेक झोपड्या आहेत. त्या झोपडय़ांतील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका संदिग्ध आहे. केंद्र सरकारच्या जमिनीवर असलेल्या झोपडय़ांना पाडकामाच्या नोटिसा दिल्या जातात. त्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण आखले पाहिजे, अशी आग्रही मागणी शिवसेना शिष्टमंडळाने केली. निवडणुकीपूर्वी रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचे ढोंग भाजप सरकारने केले. निवडणूक काळात आश्वासन दिले, मात्र आजही कुठल्याही स्थानकाचे नाव बदलले नाही. करी रोडचे लालबाग करायला इतका वेळ लागतो? केवडीयाचे नाव लगेच कसे बदलले? हे सर्व राजकारण सुरू आहे, असा दावा शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. यावेळी मुंबईच्या विविध रेल्वे स्थानकांतील पादचारी पुलांच्या प्रश्नांकडेही लक्ष वेधले.
सीएसएमटीसमोर शिवरायांचा पुतळा उभारा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू
गुजरातच्या केवडीया स्टेशनसमोर स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला आहे. त्याचा आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो. मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करण्याचा मुद्दा मांडला की याबाबत धोरण नसल्याचे सांगतात. वल्लभभाईंचा पुतळा उभारायला धोरण आहे आणि शिवरायांचा पुतळा उभा करायला धोरण नाही, हे काय चाललेय? तिथीनुसार होणाऱया शिवजयंतीपूर्वी यासंदर्भातील धोरणात्मक निर्णय घेऊन पुतळा उभारा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू, असा इशारा शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला दिला. याचवेळी पुतळा उभारणीबाबत मॉडेल प्रशासनाला देण्यात आले.
शिष्टमंडळाच्या भेटीनंतर लगेच कार्यवाही सुरू
कोकणात जाणाऱ्या पॅसेंजर दादरवरून कशा सोडता येतील, या ट्रेनचा इतर गाडय़ांवर कोणताही परिणाम होणार नाही, याबाबत रेल्वे कामगार सेनेचे संजय जोशी, बाबी देव यांनी अभ्यासपूर्ण म्हणणे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक मीना यांच्यापुढे मांडले. त्यावर रेल कामगार सेना पदाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या पर्यायाच्या अनुषंगाने येत्या तीन दिवसांत दादर ते दिवापर्यंतच्या मार्गाची पाहणी करा आणि अहवाल सादर करा, असे आदेश मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांनी प्रशासनाला दिले.