
काळाचौकी ते महालक्ष्मी या मार्गावर धावणारी 77 क्रमांकाची बस बेस्टने अचानक बंद केल्यामुळे प्रवासी आणि भाविकांची प्रचंड गैरसोय होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. याची गंभीर दखल घेत आज शिवसेनेने बेस्ट प्रशासनाला जाब विचारला. ही बस तातडीने सुरू करावी, अन्यथा शिवसेना स्टाईल जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.
काळाचौकी ते महालक्ष्मी या दरम्यान सुरू असणारी रूट क्रमांक 77 ही बस बेस्ट प्रशासनाने बंद केल्यामुळे काळाचौकी श्रावण यशवंत चौकपासून महालक्ष्मी परिसरात जाणाऱया प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत शिवसेनेकडे रहिवाशांनी धाव घेतली. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक दत्ता पोंगडे, शाखाप्रमुख जयसिंग भोसले, उपशाखा संघटक दिव्या दुखंडे यांनी केलेल्या विनंतीनुसार शिवडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी आज बेस्टच्या मुख्य वाहतूक महाव्यवस्थापक प्रवीण शेट्टी यांच्यासमवेत वडाळा आगार येथे बैठक घेतली. या बैठकीत सविस्तर चर्चा करून सदर बस लवकरात लवकर सुरू करण्यात यावी यासाठी निवेदन महाव्यवस्थापकांना दिले. बस जर लवकर सुरू झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. सदर निवेदन देताना बेस्टचे माजी अध्यक्ष अनिल कोकीळ, दिव्या दुखंडे, सुरासे, चंद्रकांत घाग, प्रीतम दादरकर, मंगेश चव्हाण यांच्यासह अनेक प्रवासीही उपस्थित होते.