दादर-रत्नागिरी ट्रेन नियमित सुरू करा! शिवसेनेची मध्य रेल्वेकडे आग्रही मागणी

शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मध्य रेल्वेने कोकणातील जनतेच्या सोयीसाठी होळीनिमित्त दादर-रत्नागिरी हॉलिडे स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला. चार दिवस चाकरमान्यांच्या सेवेत धावलेल्या या स्पेशल ट्रेनने दुपारच्या वेळेतील वाहतुकीची व्यवहार्यता सिद्ध केली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने संबंधित वेळेत दादर-रत्नागिरी ट्रेन नियमित सुरु करावी, अशी आग्रही मागणी करीत शिवसेना खासदार संजय दीना पाटील यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले आहे.

दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन मध्य रेल्वेने अचानक बंद केल्या. त्यामुळे कोकणात जाणाऱया चाकरमान्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. याबाबत शिवसेनेने ‘रेल रोको’ आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर मध्य रेल्वेने दोन्ही ट्रेन सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आणि ट्रेनची व्यवहार्यता तपासण्याची कार्यवाही सुरू केली. यादरम्यान होळी सणानिमित्त 11, 13 आणि 16 मार्चला दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी दादर-रत्नागिरी हॉलिडे स्पेशल ट्रेन सोडली. इतर नियमित गाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीत होऊ न देता ही स्पेशल ट्रेन धावली. या गाडीची यशस्वी धाव विचारात घेऊन याच वेळेत दादर-रत्नागिरी ट्रेन नियमित सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.