
देशाच्या तिजोरीवर दरोडा टाकून अनेक उद्योगपतींनी पलायन केले. मात्र शेतकरी असे पलायन कधी करत नाही. तो लढतो झगडतो, संघर्ष करतो. तो जगाचा पोशिंदा आहे. नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा केल्या होत्या. प्रत्यक्षात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे बड्या बड्या उद्योगपतींचे कर्जे तुम्ही माफ करता त्यांच्यावर सवलतींचा वर्षाव करता, तीच सहानुभूती शेतकऱयांच्या बाबतीत दाखवा. शेतकरी जगला तर सगळे जगतील. त्यामुळे पोशिंद्या शेतकऱ्याची बिकट अवस्था लक्षात घेऊन केंद्र सरकारने तातडीने कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी शिवसेनेने आज लोकसभेत केली.
देशातील कृषीविषयक स्थितीवर लोकसभेत आज चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होत शिवसेना खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बिकट स्थितीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. शेतकरी सध्या अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडला आहे. शेतमालाचे भाव वाढलेले नाहीत, मात्र महागाई वाढली आहे. उत्पादन खर्च वाढला. शेती परवडेनाशी झाली आहे. त्यातच शेतकरी भासवून बोगसगिरी करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेणारे लुटारू तयार झाले आहेत. परभणी जिह्यात असे अकरा हजारांहून अधिक बोगस विमाधारक शेतकरी सापडले असल्याचा गौप्यस्फोट करत खासदार जाधव यांनी बोगस शेतकऱयांची यादीच सभागृहासमोर मांडली. ज्यांना जमिनीच नाहीत अशांना शेतकरी दाखवले गेले आहे त्यांनी विमा योजनेचा लाभ उठवला आहे. हे दुर्दैवी आहे. सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
अग्रीम विमा योजना फक्त नावाला; दोषींवर कडक कारवाई करा
अतिवृष्टी, ढगफुटी यामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर मात करण्यासाठी सरकारने अग्रीम विमा योजना जाहीर केली, मात्र ही योजना फक्त नावालाच आहे. गेल्या सहा महिन्यांत ना शेतकऱयांना अग्रीम विमा मिळाला नाही, विमा कंपनीवर गुन्हा दाखल झाला. यासंदर्भातील दोषींवर सरकारने कडक कारवाई करावी, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी केली. कृषिप्रधान राज्य असलेल्या महाराष्ट्रातील शेतीचे क्षेत्र घटत आहे, हे चिंताजनक व विचार करण्याजोगे आहे, असे सांगत खासदार जाधव यांनी या मुद्दय़ाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.