दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. तिमिरातून तेजाकडे नेणारा दीपोत्सव. यंदाची दिवाळी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आहे. त्यामुळे दिवाळीत प्रचाराचे फटाके तर फुटणारच. त्याची सुरुवात शिवसेनेने केली आहे. शिवसेनेने काही दिवसांपूर्वी मशाल गीत लाँच केले होते. या गीताला तुफान प्रतिसाद मिळत आहे. अशातच शिवसेनेने आज आणखी एक व्हिडीओ लाँच केला. ‘उठा उठा दिवाळी आली, मशाल पेटवण्याची वेळ झाली…’ असा तेजोमय संदेश व्हिडीओतून देण्यात आला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारांची नावे जाहीर होणे, एबी फॉर्म वाटप, अर्ज भरणे अशा प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. प्रत्येक पक्षाने व्हिडीओ, जाहिरातींच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतली आहे. शिवसेनेचा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आलेला हा व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओत आजी घरोघरी जाऊन ‘‘उठा उठा दिवाळी आली’’ असे म्हणत सगळ्यांना जागं करत आहेत. ‘‘मशाल पेटवली का?’’ असे त्या तरुणाला विचारत आहेत. ‘सगळ्यांच्या दारात प्रकाश पाडायचा असेल तर मशाल पेटवायला हवी’ असा संदेश देतात आणि मशालरूपी पंदील तरुणाच्या हातात देतात. अत्यंत साधासोपा सर्वसामान्यांच्या मनाला भिडणारा, पण कल्पक असा हा व्हिडीओ आहे.
– शिवसेनेने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत धडाकेबाज प्रचार केला होता. तेच तंत्र विधानसभा निवडणुकीतही वापरण्यात आले असून शिवसेनेच्या या प्रचाराचा पहिला धमाका या जाहिरातीने झाला आहे. दिवाळीत हा प्रचार आणखीच रंगणार असून मशालीचे तेजही पाहायला मिळणार आहे.
मशाल शिवप्रेमी महाराष्ट्राची
शिवसेनेने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या ट्विटर हॅण्डवरील प्रचार व्हिडीओला नेटिजन्सची पसंती लाभत आहे. ‘मशाल शिवप्रेमी महाराष्ट्राची’ तसेच ‘मशाल – महाराष्ट्राभिमानाची निशाणी’ असे पोस्टरही जारी करण्यात आले आहेत. अन्यायाविरुद्ध संघर्षासाठी, शोषितांच्या उत्कर्षासाठी शिवसैनिकांची मशाल आता धगधगणार आहे.