
औरंगजेबाच्या कबरीवरून सोमवारी नागपूरमध्ये दोन गटांत दंगा झाला. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करीत दुपारी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर सायंकाळी दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. वाद विकोपाला गेल्यामुळे दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आणि गाड्या पेटवण्यात आल्या. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही जमावाने दगडफेक केली. पोलिसांनी जरी आता परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असले तरी अद्याप नागपूरात तणावपूर्ण शांतता आहे.
या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार अरविंद सावंत यांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले. ”देशातील समाजाचा सलोखा बिघडवायचा असा विडा सत्ताधाऱ्यांनीच उचललाय हे दुर्दैवी आहे” अशा शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे.
”मला खरंच खूप वेदना होतायत. महाराष्ट्र देशातलं वातावरण जाणीवपूर्वक अतिशय वाईट वळणावर नेण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याची परिणीती आज नागपूरात झाली. भाजपचे नेते व मंत्री ज्या पद्धतीने भडकाऊ भाषा करतायत. हे आज ना उद्या होईल असं वाटत होतं ते आज घङलं. मला महाराष्ट्रातील जनतेला विचारायचं आहे की पाहा तुम्ही कुणाला निवडून दिलंय ते पाहा. उद्धव ठाकरेंचं एक वाक्य मला नेहमी भावलेलं आहे. काही लोकांना घरं पेटवायची असतात आम्हाला चूल पेटवायची असते. यांना चूल पेटवता येत नाही म्हणून घरं पेटवली जात आहेत हे दुर्दैव आहे. देशातील समाजाचा सलोखा बिघडवायचा असा विडा सत्ताधाऱ्यांनीच उचललाय हे दुर्दैवी आहे”, असे अरविंद सावंत म्हणाले.
”भाजप धादांत खोटं बोलत आहे. तुमचा मंत्री जेव्हा एवढा वाह्यात बोलतो का नाही आळा घातला. मारा जामीन देतो टेबलवर असं सांगतो का नाही आळा घातला. तुमचे मंत्री बेबंद बोलतायत, का नाही आळा घातला. कुठल्या तोंडाने लोकांवर आरोप करता. स्वत: आधी चरित्रसंपन्न वागा मग लोकांना सांगा. मला वाईट वाटलं माझा महाराष्ट्र पेटला. गेल्या काही महिन्यात जे सुरू आहे ते बघा. प्रत्येक ठिकाणी काय सुरू आहे. कोण आहे यात. ज्यांना तुम्ही सरकारमध्ये बसवलंयत तेच जबाबदार आहेत. काय गरज होती विषय काढायची. तुमचं अपयश लपविण्यासाठी कुठल्या थराला जाताय. महाराष्ट्र पेटवताय. महाराष्ट्राच्या संस्कृतीला इतक्या खालच्या पातळीवर आणून ठेवलंय. इतकं अधपतन कधी झालं नव्हतं, असं अरविंद सावंत म्हणाले.