अरविंद सावंत यांची लोकसभा नेतेपदी, तर संजय राऊत यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती; अनिल देसाई प्रतोद

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नऊ खासदार निवडून आले. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांनी सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकत हॅटट्रिक साधली. त्यानंतर आता त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. लोकसभेमध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दक्षिण-मध्य मुंबईचे नवनिर्वाचित खासदार अनिल देसाई यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची राज्यसभा गटनेतेपदी आणि दोन्ही सभागृहांच्या संसदीय पक्षाचे नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून या नियुक्तींची माहिती दिली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्राच्या सुरुवातीलाच लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. 18व्या लोकसभेमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 9 सदस्य असून राज्यसभेत 2 सदस्य आहेत. खासदार अरविंद सावंत यांची लोकसभेच्या गटनेतेपदी, तर खासदार अनिल देसाई यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांची राज्यसभेच्या गटनेतेपदी आणि दोन्ही सभागृहांच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती पत्राद्वारे लोकसभा अध्यक्षांना कळविण्यात आली आहे.