वेळ येईल तेव्हा एकटं लढण्याचा निर्णय घेईन! संघ, भाजपा आणि अमित शहा यांच्यावर चौफेर हल्ला, सालटी काढली; उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी आज अंधेरीच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर निष्ठेचे विराट दर्शन घडले. शिवसेनेच्या महामेळाव्याच्या निमित्ताने शिवसैनिकांचे वादळच मुंबईत थडकले. याच वादळाच्या साक्षीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली. आपल्या 35 मिनिटांच्या तडाखेबंद भाषणात उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर चौफेर हल्ला करत अक्षरशः सालटी काढली. ‘या महाराष्ट्राने औरंगजेबाला झुकवले तिथे अमित शहा किस झाड की पत्ती, असे दरडावतानाच जेवढे अंगावर याल तेवढे वळ अंगावर घेऊन दिल्लीला जाल,’ असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला. आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवाव्या असा शिवसैनिकांचा सूर आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी थेट प्रश्न विचारला. एकटं लढायची तयारी आहे का, असे विचारताच ‘होय’ असा हुंकार घुमला. त्याच हुंकारावर जोर देत वेळ येईल तेव्हा एकटं लढण्याचा निर्णय घेऊ, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच आपण समोरासमोर भेटतोय, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला संबोधित करायला सुरुवात केली. दोन महिन्यांपूर्वी निवडणुकीचा जो निकाल लागला तो मला पटलेला नाही, तुम्हाला पटलाय का? असे त्यांनी विचारले असता उपस्थित प्रचंड गर्दीने नाही, असा प्रतिसाद दिला.

निवडणुकीच्या निकालावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेचा यावेळी उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, मधे अब्दाली महाराष्ट्रात येऊन गेले. कोण?… अमित शहा आणि त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातला विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणारा आहे. पण अमित शहाजी, जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो भविष्यात तुम्हाला दिसेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. मराठी माणसाच्या नादी लागू नका, औरंगजेबाला झुकवले तिथे अमित शहा किस झाड की पत्ती आहे, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे उपस्थित प्रचंड गर्दीवर नजर फिरवत म्हणाले की, अमित शहा… तुम्ही माझी जागा ठरवू शकत नाही. माझी जागा ठरवणारी ही शिवसेनाप्रमुखांनी दिलेली वडिलोपार्जित संपत्ती आहे. जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक माझ्या सोबत आहात तोपर्यंत मी पक्षप्रमुख आहे. गद्दारांनी वार केले तर उद्धव ठाकरे संपणार नाही, गद्दारांना गाडूनच मी संपेन. पण एकजरी निष्ठावंत शिवसैनिक मला म्हणाला की मी बाळासाहेबांचे विचार सोडले, बाजूला हो… त्याच क्षणी मी मुख्यमंत्रीपद सोडले तसे शिवसेना पक्षप्रमुख पद सोडल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही भाष्य केले. ते म्हणाले की, ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र मला त्यांचा कुटुंबप्रमुख मानतो तो माझा महाराष्ट्र, तो माझा मुंबईकर इतक्या निष्ठुरपणे वागू शकत नाही. हारजीत होत असते, पण जसा पराभव आम्हाला धक्का देणारा होता तसा भाजपच्या अनेक लोकांना त्यांचा विजय पचनी पडलेला नाही. काहीतरी गडबड-घोटाळा नक्कीच आहे. ईव्हीएमचा तर नक्की आहे. ज्या अमित शहांनी संपूर्ण सरकारी यंत्रणा वापरून अडीच वर्षे महाराष्ट्रावर घटनाबाह्य सरकार लादते ते असातसा महाराष्ट्र आपल्या हातून सुटू देणार नाहीत.

अमित शहा मालेगावात परत येत आहेत. त्यांचा समाचार मी घेणारच. काल बोलले त्याचा आज आणि आज बोलले त्याचा उद्या समाचार घेणार, मी नाही सोडत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. अफझलखानाच्या पोवाड्यचा दाखला देत, मिठी मारली तर प्रेमाने मारू, पण पाठीत वार केला तर वाघनखं काढू, हा महाराष्ट्र आहे आणि ही महाराजांची शिकवण आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 1978 साली दगाबाजी केली म्हणून महाराष्ट्रातील जनतेने त्यांना 20 फूट जमिनीत गाडले असेही अमित शहा म्हणाले, पण त्यांना कल्पना नसेल की 78 साली शरद पवार यांनी पुलोद सरकारचा जो प्रयोग केला होता त्या शहांच्या मते दगाबाजी करून बनवलेल्या सरकारमध्ये भाजपाही होता आणि चेंबूरचे भाजपाचे हशू आडवाणी नावाचे मंत्री होते, असाही टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. आम्ही तुमचा दगाबाजीचा इतिहास काढला तर श्यामाप्रसाद मुखर्जींपासून सगळं काढता येईल. जनता पक्ष फोडण्यासाठी तेव्हाचा जनसंघ आघाडीवर होता. ही दगाबाजीची बीजे अमित शहाजी तुमच्यात आहेत आमच्यात नाही. महाराष्ट्र कधी कुणाशी दगाबाजी करू शकत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणुकीत शिवसेना गाफील राहिली त्याचा गैरफायदा भाजपने घेतला. लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना भ्रमात राहिली हे सत्य मानले पाहिजे. आपल्याला वाटले भाजपचे गाढव आपण अडवले आहे. आता विधानसभा जिंकलीच, पण नाही म्हटले तरी आपण गाफील राहिलो. त्याचा गैरफायदा भाजपने घेतला आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबद्दल अपप्रचार करण्यात आला, असे उद्धव ठाकरे म्हणाले. लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेला मी जमलेल्या देशभक्त महाराष्ट्रप्रेमी बंधू, भगिनी आणि मातांनो असे म्हणत होतो यात काय चूक केली? हिंदू देशप्रेमी, महाराष्ट्रप्रेमी नाहीत का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील चिता कॅम्प येथे शिवसेनेचे अनिल देसाई यांच्यासाठी झालेल्या प्रचारसभेचा दाखला यावेळी दिला. त्यावेळी आपण तिथे उपस्थित 90 टक्के मुस्लिमांना विचारले होते की, मी हिंदुत्व सोडले आहे का? त्यावर त्यांनी सांगितले… नाही. माझे हिंदुत्व त्यांनीही हात उंचावून मान्य केले होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बाबरी प्रकरणात मी नाही वाजपेयींनी माफी मागितली

92-93 ला जे घडले त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली असे खोटे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, बाबरीसाठी मी नाही तर अटलबिहारी वाजपेयींनी मागितली होती. बाबरी पाडली ‘इट वॉज द टेरिबल मिस्टेक’ असे उद्धव ठाकरे नाही तर लालकृष्ण आडवाणी म्हणाले होते. माफी मी मागितली नव्हती. आता त्यांना भाजपाने बाजूला करून टाकले आहे. नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक खायला मोदी गेले होते, उद्धव ठाकरे नाही. लहानपणी मुस्लिमांच्या घरून मला जेवण यायचं आणि त्यांच्या ताजियाखालून मी जायचो हे उद्धव ठाकरे बोलले नाही, हे नरेंद्र मोदी बोलले आहेत, अशीही टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “माझ्या मोबाईल फोनमध्ये 100 हून अधिक फोटो आहेत. सगळेजण टोप्या घालून बसले आहेत. मोहन भागवत मशिदीत गेले होते, उद्धव ठाकरे गेलेले नाहीत. दगाबाजीचा उल्लेख अमित शहा करतात आणि आम्हाला हिंदुत्व शिकवतात? प्रजासत्ताक दिन येतो आहे, आपल्या देशाचा तिरंगा आहे त्यातही हिरवा रंग आहे. स्वातंत्र्यानंतर भाजप तो तिरंगा त्यांच्या कार्यालयावर फडकवत नव्हता. आमचा झेंडा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे, त्याला डाग लावण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. आम्ही देशप्रेमी मुस्लिमांना आमचे मानतोच, पण देशप्रेमी मुस्लिमांनी तुमच्याविरोधात आम्हाला मतदान केले म्हणून तुम्हाला पोटशूळ उठला असेल तर अमित शहांनी भाजपाच्या झेंडय़ातला हिरवा रंग आधी काढून दाखवावा आणि नंतर आम्हाला हिंदुत्व शिकवावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.
कुणाला रक्त हवे असेल तर आरएसएसवाले गोमूत्रदान करतील

बीकेसीतील सभेमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याबद्दल बोललो होतो. महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी भाजपने बाहेरच्या राज्यातून 90 हजार लोक आणले होते असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. काही म्हणतात ते संघाचे लोक होते. आता ते 90 हजार कुठे गेले? ते संघाचे कार्यकर्ते असतील तर आता धावून येतील का? मुलांना शाळेत प्रवेश देतील का? कुणाला रक्त हवे असेल तर आरएसएसवाले रक्तदान करू शकतात का? ते गोमूत्र दान करू शकतात. शिवसैनिक मात्र अस्वस्थ रुग्णाला जातपात न पाहता रक्तदान करतील, पण संघाचे लोक असतील तर म्हणतील रक्त नव्हे… आम्ही गोमूत्र देतो. तापाने फणफणत होतो तेव्हा गोमूत्र पिऊन बरा झालो असे मद्रास आयआयटीचे संचालक कामकोटी मध्यंतरी म्हणाले होते. धन्य आहेत. अशी माणसं शिकतात कशी? शिकतात काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

जय श्रीरामनंतर जय शिवराय बोललेच पाहिजे

वर्षभरापूर्वी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन झाले. पण अजून त्या मंदिराचे बांधकामच पूर्ण झालेले नाही तरीही ‘जय श्रीराम’, ‘जय श्रीराम’, ‘जय श्रीराम’ असा भाजपकडून उन्माद सुरू आहे. त्यावेळी अयोध्येत शिवसैनिक उतरले नसते तर भाजपवाले सत्तेवर नसते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘जय श्रीराम’ आम्ही बोलतो तसे तुम्हालाही महाराष्ट्रात ‘जय भवानी, जय शिवराय’ बोलावेच लागेल. ‘जय हिंद’नंतर ‘जय महाराष्ट्र’ बोलतो तसे ‘जय श्रीराम’नंतर ‘जय शिवराय’ बोललेच पाहिजे. कारण प्रभू श्रीराम कधी होऊन गेले. त्यांच्या जन्मभूमीवरून वाद झाला. पुन्हा मंदिर बांधले. त्यांनी राक्षस मारले. रामराज्य आणले होते, पण आमचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर मोदी काय, अमित शहा काय कुणीच ‘जय श्रीराम’ बोलले नसते. म्हणून पहिला शिवरायांचा जयजयकार करा आणि नंतर ‘जय श्रीराम’ बोला असे सांगतानाच, आम्ही महाराष्ट्रात ‘जय श्रीराम’, ‘जय शिवराय’च बोलणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. जन्मदात्या बापाला विसरण्याइतके आम्ही भाजपासारखे कृतघ्न नाही, असेही ते म्हणाले.

बाबरी पाडल्यानंतर ‘आम्ही नाही त्यातले’ म्हणणाऱ्यांकडून हिंदुत्व शिकायचे का?

1987 साली शिवसेनेने पहिली पोटनिवडणूक पार्ल्यातली लढली होती ती देशातल्या निवडणुकांच्या इतिहासात हिंदुत्वावर लढलेली होती. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी दाखवून दिले होते की, हिंदूसुद्धा मतदान करून निवडणूक जिंकून देऊ शकतात.

1987 साली शिवसेनेचे रमेश प्रभू आणि काँग्रेसकडून प्रभाकर कुंटे उभे होते. त्याही वेळेला हिंदुत्वाचा प्रचार तुफान झाला. त्याही वेळेला शिवसेनाप्रमुखांची स्पष्ट भाषणे आहेत. आम्हाला देशप्रेमी मुस्लिमांचे वावडे नाही, पण पाकधार्जिणा कुरूलकरसारखा हिंदू असला तरी मान्य नाही. इतके शिवसेनेचे हिंदुत्व स्पष्ट आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तेव्हा फक्त दुहेरी लढत झाली नव्हती तर शिवसेनेच्या हिंदुत्वाला अपशकुन करायला त्यावेळी भाजपने जनता पक्षाच्या प्राणलाल व्होरांना पाठिंबा दिला होता, असा दाखलाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यावेळी भाजपचे हिंदुत्व कुठे गेले होते? असा सवालही त्यांनी केला. त्यानंतर प्रमोद महाजन आणि इतरांनी ‘मातोश्री’चे उंबरठे झिजवायला सुरुवात केली. कारण भाजपला शिवसेनाचा दुरुपयोग करून घ्यायचा होता, याचीही आठवण त्यांनी करून दिली. काड्या पेटवायच्या आणि दंगली उसळल्या की पळून जायचे असेच हे भाजप आणि आरएसएस आहे, अशी टीकाही त्यांनी केली. बाबरी बाबरी बाबरी म्हणून सर्व माहोल पेटवला आणि प्रत्यक्ष बाबरी पडल्यानंतर ‘आम्ही नाही त्यातले’ अशी ही भाजपची नामर्दाची अवलाद. आणि शिवसेनेने त्यांच्याकडून हिंदुत्व शिकावे? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
दगाबाजीची बीजे अमित शहाजी तुमच्यात आहेत आमच्यात नाही. महाराष्ट्र कधी कुणाशी दगाबाजी करू शकत नाही.

जसा पराभव आम्हाला धक्का देणारा होता तसा भाजपच्या अनेक लोकांना त्यांचा विजय पचनी पडलेला नाही. काहीतरी गडबड-घोटाळा नक्कीच आहे. ईव्हीएमचा तर नक्की आहे.

भाजपने एक निवडणूक जिंकली म्हणून महाराष्ट्र संपत नाही

शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले नसते आणि औरंगजेबाला मोकाट सोडला असता तर संभाजीराजांच्या त्या निर्घृण हत्येनंतर 26 वर्षे ताराराणीने औरंगजेबाला झुंजवत ठेवले नसते तर गुजरात पहिले औरंगाबादच्या चरणी लीन झाले असते आणि संपूर्ण हिंदुस्थान हिरवागार झाला असता. हिमालयाच्या मदतीला कोण धावते. सह्याद्री होता म्हणून अफझलखानाचा कोथळा निघाला, असे म्हणत उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने एक निवडणूक जिंकली म्हणून महाराष्ट्र संपत नाही. मिर्झाराजे हिंदूच होता, पण गद्दार होता. शिवसेनेला उपरे अडवू शकत नाहीत. मिर्झाराजे प्रचंड सैन्य घेऊन आला होता तसे पैसे देऊन भाजपने गद्दार शिवसेनेच्या अंगावर सोडलेत, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी डागले. त्या वेळी गोदी मीडिया असता तर शिवाजी महाराज संपले असे दाखवले असते, पण औरंगजेबाच्या छाताडावर भगवा रोवणारा हा महाराष्ट्र आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनाप्रमुखांच्या जीवनपटाचे दर्शन

शिवसेनेच्या या महामेळाव्याच्या निमित्ताने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा माहितीपट दाखवण्यात आला. शिवसेनाप्रमुखांच्या जुन्या आठवणी, शिवसैनिकांमध्ये चैत्यन्याचा अंगार फुलवणारी शिवसेनाप्रमुखांची भाषणे, मराठी माणसांवरील अन्यायाच्या विरोधात उभे ठाकलेले शिवसेनाप्रमुख अशा जुन्या आठवणींना उजाळा या माहितीपटाच्या निमित्ताने शिवसैनिकांनी अनुभवला व पुन्हा शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आणि पुढील लढाईसाठी शिवसैनिक सज्ज झाले. हा माहितीपट तयार करणाऱया दीपक पांडुरंग राणे आणि मुकुंद दीपक राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मोदींच्या अश्वमेधाचं गाढव महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकीत अडवलं

महाराष्ट्राने मोदींच्या अश्वमेधाचे गाढव लोकसभेत ज्या पद्धतीने अडवले तो घाव त्यांच्या वर्मी बसला आहे. ते अजून त्यातून उठत नाहीत. त्यांना माहीत होते ज्याक्षणी महाराष्ट्र आपल्या हातून गेला की दिल्लीतील सरकार कोलमडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचा निकाल आपल्या मनासारखा लागला असता तर दिल्लीतील सरकार कोलमडले असते ही महाराष्ट्राची ताकद आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

रुसू बाई रुसू, गावात बसू… आता डोळ्यात आसू

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचीही खिल्ली उडवली. ते म्हणाले की, शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना मान दिला जात होता. आता विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना सांगण्यात आले आहे की, बसायचे तर बसा नाहीतर गावी निघून जा. ते एक गाणं होतं ना, ‘रुसू बाई रुसू कोपऱ्यात जाऊन बसू… गावात बसू का कोपऱ्यात बसू’ तशी त्यांची अवस्था झाली आहे. पाहिजे ते मंत्रीपद दिले नाही म्हणून रुसले, गेले गावी. दावोसला नेले नाही… रुसले, गेले गावी. खुर्ची बाजूला ठेवली नाही, गेले गावी. रुसू बाई रुसू गावात जाऊन बसू, पण आता डोळय़ातले आसू दिसायला लागले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ऑनलाइन सदस्य नोंदणीचा शुभारंभ

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने शिवसेनेच्या ऑनलाइन सक्रिय सदस्य नोंदणीचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

शिवसैनिकांचा सत्कार

गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटा येथे जाणाऱया बोटीला अपघात झाला होता. त्या वेळी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता समुद्रात बुडणाऱया प्रवाशांचा जीव वाचवणाऱया तापस्कर, अरीफ बामणे व किफायत मुल्ला या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवाई ट्रस्ट च्यावतीने या शिवसैनिकांचा प्रत्येकी सव्वा लाख रुपयांचे पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

विजेत्या क्रिकेट संघाचा सत्कार

वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यातील विजेत्यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विजेता संघ वर्सोवा विधानसभा युवासेना, उपविजेता संघ शाखा क्रमांक 62, सामनावीर विवेक शिवेकर व अन्य विजेत्यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सूड… सूड… आणि सूड… होय! मला सूड हवाय!!

उद्धव ठाकरे म्हणाले, महापालिका निवडणुका येत आहेत. मी सगळय़ांशी बोलतो आहे. सगळेच म्हणताहेत, एकटं लढा… त्यावर हो असा आवाज घुमला. ताकद आहे… अमित शहांना जागा दाखवणार आहात… हो असा आवाज घुमतच होता. तेव्हा ठीक आहे… अजून निवडणूक जाहीर झाली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो त्या भ्रमातून बाहेर या. ज्या दिवशी माझी खात्री पटेल की आपली तयारी झाली आहे, मी कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, पण यावेळेला मला सूड उगवून पाहिजे. सूड सूड आणि सूड… होय सूड… जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो, मराठी आईच्या कुशीवर वार करतो तो गद्दार आणि त्या गद्दाराचा वरदहस्त मला महाराष्ट्रात दिसता कामा नये, अशी हाक उद्धव ठाकरे यांनी देताच अंधेरीच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचा परिसर ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवराय’ अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमला.